Is India the secret factor in the Putin-Trump meeting Know the truth about the Alaska discussion
Trump-Putin Alaska Meeting : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अलास्कामध्ये झालेली ऐतिहासिक भेट जागतिक राजकारणाचे स्वरूप बदलवू शकते. वरकरणी ही चर्चा युक्रेन युद्ध आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाबद्दल असली तरी, पडद्यामागे एक महत्त्वाचा ‘घटक’ सतत हलता ठेवत होता तो म्हणजे भारत.
२०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक तेल बाजारपेठेत मोठे उलथापालथ झाले. या संकटात भारताने आपले राष्ट्रीय हित जपत रशियाकडून तुलनेने स्वस्त दरात मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. पण हाच मुद्दा अमेरिकेच्या डोळ्यात खुपला. ट्रम्प प्रशासनाने भारतावर जड शुल्क लादले आणि त्याला थेट पुतिनच्या चर्चेशी जोडले. “भारतावर लावलेल्या शुल्कामुळेच पुतिन यांना वाटाघाटीच्या टेबलावर आणता आले,” असे ट्रम्प यांचे स्पष्ट विधान वादळ माजवणारे ठरले.
अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले की, पुतिन यांना चर्चेत बसवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न आवश्यक होते. भारतावर लादलेला कर हा त्याच धोरणाचा भाग होता. भारत हा रशियाचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्राहक असताना, जर तो बाजारातून बाजूला झाला तर त्याचा थेट परिणाम मॉस्कोवर होणार, हा अमेरिकेचा विचार होता. या पार्श्वभूमीवर, भारताला एका ‘मोठ्या प्याद्यासारखे’ वापरले गेले, असा आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा सूर आहे. अमेरिका भारतावर जितका दबाव वाढवत गेली, तितकी पुतिन यांची लवचिकता वाढत गेली. मात्र, भारतासाठी ही स्थिती दोन टोकाची तलवार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पची ‘राजकीय कारकीर्द’ संपवू शकतात रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन; खळबळजनक व्हिडिओ आणि कागदपत्रे असल्याचा दावा
भारताने कायम आपल्या भूमिकेत स्पष्ट केले आहे की रशियन तेलाची खरेदी ही फक्त देशाच्या ऊर्जा गरजांसाठीच केली जाते. त्यातही भारताने जी किंमत मोजली ती G7 देशांनी निश्चित केलेल्या ‘प्राइस कॅप’ पेक्षा कमी होती. म्हणजेच पाश्चात्य राष्ट्रांनी ठरवलेल्या मर्यादेत राहूनच भारताने व्यवहार केला. त्यामुळे “भारत रशियाला मदत करतोय” हा अमेरिकेचा आरोप संपूर्णपणे ग्राह्य धरता येत नाही. पण जर अलास्कातील ट्रम्प-पुतिन चर्चा यशस्वी झाली नाही, तर भारतावरील कर आणखी कडक होण्याची शक्यता बेसंट यांनी आधीच सूचित केली आहे. याचा थेट फटका भारताच्या ऊर्जा सुरक्षेला आणि व्यापार संतुलनाला बसू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल
अमेरिकेच्या दृष्टिकोनातून, भारतावरील कर म्हणजे पुतिनवरील दडपणाचे ‘सर्वात प्रभावी हत्यार’ आहे. ट्रम्प यांचा विश्वास आहे की भारतासारखा खरेदीदार गमावल्याने रशियाला मोठा तोटा होईल आणि हा तोटा पुतिनना चर्चेला भाग पाडेल. पण भारतासाठी हा खेळ धोकादायक ठरू शकतो. एका बाजूला ऊर्जा सुरक्षेची गरज, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेचा आर्थिक दबाव या कचाट्यात भारताने परराष्ट्र धोरणात योग्य समतोल साधणे गरजेचे आहे. अलास्का चर्चेचा निकाल भारताच्या या ‘ऊर्जा समीकरणाला’ दिशा देणार, हे नक्की.