गाझा ते सुदान… युद्धात महिलांचा शारीरिक छळ मोठ्या प्रमाणावर; संयुक्त राष्ट्रांनी सादर केला थरारक अहवाल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
UNICEF Sudan sexual violence data : जगातील युद्धे केवळ सीमारेषा बदलत नाहीत, तर ती असंख्य जिवांचे आयुष्य उद्ध्वस्त करतात. विशेषतः महिला आणि मुलींसाठी ही युद्धे भीषण स्वप्न ठरतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालाने पुन्हा एकदा या कटू वास्तवावर शिक्कामोर्तब केले आहे युद्धात महिलांचा शारीरिक छळ आणि लैंगिक हिंसाचार चिंताजनक वेगाने वाढत आहे.
गेल्या वर्षी संघर्षांदरम्यान लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये तब्बल २५% वाढ झाली, असे अहवालात नमूद आहे. मध्य आफ्रिका, काँगो, हैती, सोमालिया आणि दक्षिण सुदान ही सर्वाधिक प्रभावित देशांची यादीत आहेत. २०२४ मध्ये जगभरात ४,६०० हून अधिक लोक अशा अत्याचारांचे बळी ठरले; त्यातील बहुसंख्य महिलांवर सशस्त्र गटांनी हल्ला केला, तर काही प्रकरणांमध्ये सरकारी सैन्यांचाही सहभाग होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Fake Indian Currency Case : पाकिस्तान-नेपाळशी संबंधित बनावट नोटा प्रकरणात NIAने आणखी एका आरोपीला केली अटक
सुदानमध्ये चालू असलेल्या गृहयुद्धात लैंगिक अत्याचाराचे प्रमाण धक्कादायक आहे. १४७ मुली आणि ७४ मुलांवर एकूण २२१ बलात्काराचे गुन्हे नोंदले गेले. अधिक भीषण बाब म्हणजे, यातील १६% बळी पाच वर्षांखालील होते, तर चार बळी केवळ एका वर्षाचे होते.
गाझामध्ये, इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कैदेत असलेल्या महिलांवर आणि पॅलेस्टिनी बंदिवानांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. युक्रेनमध्ये, रशियन सैन्य व त्यांचे सहयोगी गट यांच्यावर युद्धकैद्यांवर बलात्कार आणि शारीरिक छळाचे गंभीर आरोप आहेत.
या अहवालात ६३ सरकारी आणि गैर-सरकारी घटकांची नावे आहेत, जे युद्धकाळातील लैंगिक हिंसाचारासाठी जबाबदार असल्याचा संशय आहे. पहिल्यांदाच इस्रायलच्या लष्करी दलांचा आणि रशियन सैन्याचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी स्पष्ट इशारा दिला आहे परिस्थिती सुधारली नाही तर पुढील वर्षीही ही नावे यादीत राहतील.
अहवालानुसार, संघर्षातील लैंगिक हिंसाचार केवळ बलात्कारापुरता मर्यादित नसून त्यात जबरदस्ती विवाह, जबरदस्ती गर्भधारणा, जबरदस्ती गर्भपात, जबरदस्ती नसबंदी, लैंगिक गुलामी, वेश्याव्यवसाय आणि कैदेत असताना लैंगिक छळाचा समावेश आहे. महिलांवरच नव्हे तर पुरुष आणि मुलांवरही ताब्यात असताना बलात्कार, धमक्या, विद्युत धक्का आणि शारीरिक छळाचे प्रकार नोंदवले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : K2 सर करण्याचे स्वप्न झाले पूर्ण पण परतताना मात्र गाठले मृत्यूने; चिनी गिर्यारोहकाचा दगड पडल्याने मृत्यू
हा अहवाल केवळ आकड्यांचा संच नाही; तो हजारो उद्ध्वस्त आयुष्यांचे दस्तऐवज आहे. युद्धाचा सामना करणाऱ्या प्रत्येक स्त्री-मुलीला केवळ गोळ्या आणि बाँबच नव्हे तर अमानुष शारीरिक छळाचाही सामना करावा लागतो. घर, रस्ता किंवा कैद कुठेही त्या सुरक्षित नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे की या हिंसाचारावर आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर ठोस कारवाईची गरज आहे. अन्यथा, युद्धातील सर्वात जास्त किंमत महिलांनाच चुकवावी लागेल.