Xi Jinping losing power : चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेले शी जिनपिंग गेले दोन आठवडे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे चीनमध्ये संभाव्य सत्ता बदलाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत. विशेषतः ब्राझीलमध्ये होणाऱ्या आगामी ब्रिक्स परिषदेतही शी उपस्थित राहणार नाहीत, अशी माहिती समोर आल्यामुळे अटकळींना अधिकच उधाण आले आहे.
शी जिनपिंग यांनी सत्तेचा ताबा घेतल्यापासून पहिल्यांदाच त्यांनी सार्वजनिक उपस्थिती टाळली आहे. यामुळेच ‘शी यांची राजवट संपते आहे का?’ हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या जागी कोण नेते येऊ शकतो, याबाबत आता चर्चेत पाच प्रमुख नावांचा उल्लेख होतो. या नेत्यांची पार्श्वभूमी, ताकद, व पक्षातील स्थान पाहता, पुढील नेतृत्व कोणाकडे जाईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
१. जनरल झांग युक्सिया – लष्कराच्या पाठबळासह बलाढ्य नाव
झांग युक्सिया हे चीनच्या शक्तिशाली केंद्रीय लष्करी आयोगाचे पहिले उपाध्यक्ष आहेत आणि लष्करातील प्रभावी व्यक्ती मानले जातात. माजी अध्यक्ष हू जिंताओ यांचे समर्थन त्यांना असल्याचे बोलले जाते. शी यांच्या अनुपस्थितीत झांग युक्सिया पक्षात आणि लष्करात आपली पकड मजबूत करत आहेत. राष्ट्रपतीपदासाठी ते एक बलाढ्य दावेदार मानले जात आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘दलाई लामांचा नाही तर माओचा पुनर्जन्म शोधा’; तिबेटी निर्वासित सरकारचा चीनवर जोरदार हल्लाबोल
२. ली कियांग – शी जिनपिंग यांचे विश्वासू आणि सध्याचे पंतप्रधान
ली कियांग यांची २०२३ मध्ये चीनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली होती. ते शी यांचे दीर्घकाळचे सहकारी आहेत. शांघाय कोविड लॉकडाऊन काळातील त्यांचे नेतृत्व आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतील सक्रियता पाहता, ते सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात शक्तिशाली नेते मानले जातात. शी यांच्या जागी त्यांचं नाव सर्वांत वर आहे.
३. डिंग शूजियांग – रणनीतीतील गुंतलेला आणि जवळचा सहकारी
डिंग हे शी जिनपिंग यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ असून, त्यांना शी यांचे अत्यंत जवळचे मानले जाते. त्यांनी कधीही प्रांतिक पातळीवर नेतृत्व केले नाही, मात्र धोरण समन्वय आणि आंतरिक राजकारणातील त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. पक्षात त्यांचे स्थान मजबूत असून, तेही एक संभाव्य उत्तराधिकारी मानले जातात.
४. वांग हुनिंग – सिद्धांतकार, पण प्रशासनात मागे
वांग हुनिंग हे चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. त्यांनी तीन राष्ट्राध्यक्षांसोबत काम केले असून, ते पक्षाचे प्रमुख विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या रणनीतीने अनेक धोरणं आकार घेतली आहेत. मात्र प्रशासकीय अनुभवाचा अभाव त्यांना राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत थोडंसं मागे टाकतो.
५. झाओ लेजी आणि ली होंगझोंग – पक्षातील वजनदार चेहरे
झाओ लेजी हे पॉलिटब्युरो स्थायी समितीतील वरिष्ठ सदस्य असून, राष्ट्रीय पीपल्स काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसरीकडे, ली होंगझोंग हे पक्षातील वरिष्ठ नेते असून, प्रादेशिक प्रशासनातून पुढे आले आहेत. त्यांचं आंतरराष्ट्रीय वर्चस्व कमी असलं तरी, शी यांना दिलेला पाठिंबा आणि पक्षातली निष्ठा यामुळे तेही शर्यतीत आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात अमेरिकेचा शक्तिप्रदर्शन करून इराणला इशारा; व्हाईट हाऊसवरून B-2 Stealth Bombers गरजले
चीनच्या सत्ताकेंद्रात अस्वस्थता
शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीने चीनच्या सत्ताकेंद्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अद्याप कोणताही अधिकृत संकेत नसला, तरी वर उल्लेखित पाच नेत्यांपैकी कोणीही पुढचा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. येत्या काळात शी जिनपिंग पुन्हा सक्रिय होतात का, किंवा चीनमध्ये खरोखरच सत्ता परिवर्तन होते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.