भारताच्या भूमीवर दलाई लामांचा पुनर्जन्म चीनला का सतावतोय? नक्की काय आहे धोरण, वाचा सविस्तर
Mao rebirth vs Dalai Lama succession : तिबेटी बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीच्या प्रश्नावरून पुन्हा एकदा भारत, चीन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले आहे. दलाई लामांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पुनर्जन्म होईल आणि त्यांच्या उत्तराधिकारीची निवड पूर्णपणे आध्यात्मिक पद्धतीनेच केली जाईल. या पार्श्वभूमीवर निर्वासित तिबेटी सरकारचे प्रमुख पेनपा त्सेरिंग यांनी चीनवर जोरदार टीका करत स्पष्ट केले की, पुनर्जन्म हा राजकीय नव्हे तर अध्यात्मिक विषय आहे आणि चीनने त्यात हस्तक्षेप करू नये.
पेनपा त्सेरिंग म्हणाले, “जर चीनला खरोखरच पुनर्जन्मावर विश्वास असेल, तर त्यांनी माओ झेडोंग, जियांग झेमिन यांचा आधी पुनर्जन्म शोधावा.” या वाक्यातून त्यांनी चीनच्या दांभिकतेवर कडाडून प्रहार केला. त्यांनी स्पष्ट केले की, चीनने तिबेटी बौद्ध धर्म, संस्कृती आणि मृत्यूनंतरच्या अध्यात्मिक प्रक्रियेचा सखोल अभ्यास केल्याशिवाय अशा मुद्यांवर बोलू नये.
चीनकडून अनेकदा असा दावा केला जातो की पुढील दलाई लामाची निवड ‘गोल्ड कलश’ (Golden Urn) पद्धतीने करावी. पण त्सेरिंग यांनी ही कल्पना फेटाळली. त्यांनी सांगितले की, ही पद्धत १७९३ मध्ये चिंग राजवंशाने राजकीय हस्तक्षेपासाठी लादली होती, परंतु त्याआधी पहिले आठ दलाई लामा या प्रक्रियेशिवाय निवडले गेले होते. त्यामुळे ही प्रक्रिया तिबेटी परंपरेचा भाग नसून चीनचा राजकीय डाव आहे, असे त्यांनी ठासून सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Texas floods 2025 : टेक्सासमध्ये महापूराचा कहर; 24 मृत, 20 हून अधिक मुली बेपत्ता, बचावकार्य सुरू
तिबेटी समाजात दलाई लामांच्या उत्तराधिकारीबाबत अनेक अफवा आहेत. याबाबत स्पष्टीकरण देताना पेनपा त्सेरिंग म्हणाले की, दलाई लामा स्वतः किमान २० वर्षे जगणार असल्याचे म्हणाले आहेत आणि योग्य वेळ आल्यावरच उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय घेतला जाईल. त्यांनी दलाई लामांच्या ९०व्या वाढदिवशी उत्तराधिकारी जाहीर केला जाणार असल्याच्या अफवांनाही फेटाळले.
पेनपा त्सेरिंग यांनी चीनवर तिबेटी बौद्ध धर्मीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की, चीनचे हे धोरण फार काळ चालणार नाही. “तिबेटी जनतेला धर्म, परंपरा आणि श्रद्धेवर दृढ विश्वास आहे. आम्ही चीनच्या या कारस्थांनांविरुद्ध शांततेच्या मार्गाने लढा देत राहू,” असे ते म्हणाले.
दलाई लामा यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, त्यांच्या परंपरेतून धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गानेच पुढील दलाई लामाची निवड होईल. कोणतीही राजकीय शक्ती मग ती चीन असो किंवा इतर कोणी, या प्रक्रियेत हस्तक्षेप करू शकत नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 57 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा अर्जेंटिनाला दौरा; मोदींच्या भेटीने भारत-दक्षिण अमेरिका संबंधांना नवे वळण
तिबेटी धर्मगुरुंच्या उत्तराधिकारीच्या मुद्यावरून चीनने वारंवार हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, निर्वासित तिबेटी सरकारचा स्पष्ट संदेश आहे की, धार्मिक परंपरा आणि तिबेटी समाजाच्या श्रद्धेवर कोणताही बाह्य हस्तक्षेप मान्य केला जाणार नाही. पेनपा त्सेरिंग यांचे वक्तव्य केवळ चीनविरोधी नाही, तर तिबेटी संस्कृती आणि धर्माच्या सन्मानासाठी उभा राहिलेला निर्धार आहे. आता संपूर्ण जगाच्या नजरा या संघर्षावर लागल्या आहेत धर्म विरुद्ध राजकारण!