Israel Iran War News Live Iran closes airspace after Israel's Operation Rising Lion
Israel Iran Attack Live News : मध्य पूर्वेतील वातावरण पुन्हा एकदा भडकले आहे. इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर आणि लष्करी तळांवर जोरदार हवाई हल्ले चढवले. या कारवाईनंतर इराणने आपले हवाई क्षेत्र बंद करत युद्धजन्य तयारीचे संकेत दिले आहेत. या घडामोडींमुळे संपूर्ण खंडात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
इस्रायली हवाई हल्ल्यात इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर हुसेन सलामी ठार झाल्याचे इराणी अधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. या हल्ल्यात आणखी एक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि दोन अणुशास्त्रज्ञ देखील मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या कारवाईला पूर्णपणे यशस्वी ठरवत देशवासीयांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. “ही मोहीम यशस्वी झाली आहे, परंतु इराणच्या संभाव्य प्रत्युत्तरासाठी प्रत्येक नागरिकाने तयार राहिले पाहिजे,” असे नेतन्याहू म्हणाले.
इस्रायलच्या हल्ल्यांवर प्रतिक्रिया देताना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “इस्रायलने आमच्या निवासी भागांवर हल्ला करून मोठी चूक केली आहे. या गुन्ह्याची त्यांना कठोर शिक्षा मिळेल,” असे खामेनी यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी असा इशाराही दिला की, “इस्रायलने स्वतःसाठी वेदनादायक अंत निश्चित केला आहे. आणि तो अंत आता अटळ आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : स्पेनमध्ये अवकाशातून पडलेल्या धातूपासून बनवलेले 3,000 वर्ष जुने दागिने सापडले; ‘Villena Treasure’तून प्राचीन विज्ञानाचा अनोखा शोध
इस्रायलच्या हल्ल्यांत इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्रात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी काळा धुर दिसून आला. इराणच्या अणुऊर्जा संस्थेने सांगितले आहे की, या स्फोटामुळे केंद्रातील अणुऊर्जेचे मुख्य संरचनात्मक भाग पूर्णतः नष्ट झाले आहेत. या कारवाईचा उद्देश इराणच्या अणु आणि क्षेपणास्त्र क्षमतेला खिळ बसवणे असल्याचे इस्रायलच्या संयुक्त राष्ट्रांतील राजदूत डॅनी डॅनन यांनी स्पष्ट केले.
इस्रायलच्या कारवाईनंतर इराणने तातडीने देशाचे संपूर्ण हवाई क्षेत्र बंद केल्याची माहिती नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने दिली आहे. NOTAM (Notice to Airmen) जारी करत पुढील आदेश मिळेपर्यंत हवाई वाहतूक थांबवण्यात आली आहे. दरम्यान, इराणच्या लष्करी नेतृत्वातही बदल करण्यात आला आहे. अॅडमिरल हबीबुल्ला सय्यारी यांची कार्यवाहक लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, इस्रायली हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जनरल बघेरी यांच्या जागी ते काम पाहणार आहेत.
इराणकडून संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील रुग्णालयांनी युद्धजन्य तयारी सुरू केली आहे. जेरुसलेममधील हदासाह मेडिकल सेंटर ने किरकोळ रुग्णांना घरी पाठवले असून, तातडीचे नसलेले उपचार स्थगित करण्यात आले आहेत.
मध्यस्थाची भूमिका निभावणाऱ्या ओमानने इस्रायलच्या हल्ल्यांना ‘धोकादायक आणि बेजबाबदार’ असे संबोधले आहे. या हल्ल्यामुळे शांततापूर्ण तोडगा निघण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसल्याचे ओमानचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लग्न न करण्याचा ट्रेंड’ वाढतोय! जपान आणि स्वीडनमध्ये सर्वाधिक अविवाहित मुली; कारण ऐकून व्हाल थक्क
इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ मुळे इराण-इस्रायल संघर्ष निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. दोन्ही देशांकडून तीव्र कारवाई व प्रतिउत्तराचे संकेत मिळत असून, हा संघर्ष केवळ द्विपक्षीय न राहता संपूर्ण खंडासाठी घातक ठरू शकतो. सध्या संपूर्ण जगाची नजर या दोन राष्ट्रांवर केंद्रित झाली आहे.