स्पेनमध्ये अवकाशातून पडलेल्या धातूपासून बनवलेले ३,००० वर्ष जुने दागिने सापडले; 'Villena Treasure'तून प्राचीन विज्ञानाचा अनोखा शोध ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Villena Treasure meteoritic iron : स्पेनच्या पुरातत्व संशोधन क्षेत्रात एक अद्भुत आणि ऐतिहासिक क्षण घडला आहे. अॅलिकॅन्टे प्रांतातील विलेना शहराजवळ सापडलेल्या ३,००० वर्षे जुना ‘विलेना खजिना’ आता नव्याने चर्चेत आला आहे. यामधून अवकाशातून पडलेल्या उल्कापिंडाच्या धातूपासून बनवलेले दोन दागिने सापडले आहेत. या शोधामुळे केवळ प्राचीन धातुकलेवर नव्हे, तर मानवाच्या खगोलीय धातूंशी असलेल्या संबंधावरही नव्याने प्रकाशझोत पडला आहे.
या दागिन्यांमध्ये एक ब्रेसलेट आणि एक सजावटीची कलाकृती आहे, ज्यांचा बनावटीसाठी वापरलेला धातू पृथ्वीवरील नाही, तर उल्कापिंडातून आलेला आहे, असा संशोधकांचा दावा आहे. स्पॅनिश राष्ट्रीय संशोधन परिषद (CSIC), राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालय आणि दिरिया गेट डेव्हलपमेंट अथॉरिटी यांच्या संयुक्त अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत.
या धातूंमध्ये अत्यधिक प्रमाणात निकेल आढळला असून, यावरून त्या उल्कापिंडाच्या मूळचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही वैशिष्ट्ये पृथ्वीवर नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या लोखंडात नसतात. विशेष म्हणजे, ही दोन्ही कलाकृती लोहयुगाच्या सुरुवातीच्या ५०० वर्षे आधीच्या म्हणजेच १४०० ते १२०० ईसापूर्व कालखंडातील असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, हा मानव इतिहासातील सर्वात जुना अवकाशधातूचा वापर असलेल्या दागिन्यांपैकी एक असू शकतो. साल्वाडोर रोविरा-लोरेन्स यांच्या नेतृत्वाखाली या कलाकृतींवर मास स्पेक्ट्रोमेट्री तंत्रज्ञानाचा वापर करून विश्लेषण करण्यात आले, ज्यातून धातूचा खगोलीय उगम सिद्ध झाला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानवर घोंगावतंय आणखी एक संकट; रावळपिंडी असो वा कराची, कुठेही होऊ शकतो घातक हल्ला
या शोधामुळे इबेरियन द्वीपकल्पातील प्राचीन समाज वैज्ञानिकदृष्ट्या किती प्रगत होता, हे दिसून येते. त्या काळातील लोकांनी केवळ उल्केच्या लोखंडाचा वापर केला नाही, तर त्याला कलात्मक आणि धार्मिक दृष्टीनेही महत्त्व दिले. धातू वितळवून त्याला विशिष्ट आकार देणे, त्याचे जतन करणे आणि सौंदर्यशास्त्राच्या कसोटीवर खरे उतरवणे ही कौशल्ये त्या प्राचीन काळातही अस्तित्वात होती, हे या शोधातून स्पष्ट होते.
१९६३ मध्ये सापडलेला विलेना खजिना स्पेनमधील सर्वात समृद्ध कांस्ययुगीन कलासंपत्तींपैकी एक मानला जातो. यामध्ये अनेक सोन्याच्या वस्तू, समारंभिक तलवारी, आणि आता उल्केच्या धातूची दागिने सुद्धा आहेत. यातील अनेक वस्तूंना धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहे. या खजिन्यातील तलवारीचे हिल्ट पोमेल आणि विशेष ब्रेसलेट यांचे स्वरूप देखील दुर्लभ मानले जाते. अशा धातूंचा वापर अत्यंत मर्यादित समुदायातच होत असे आणि तो सत्ता, श्रद्धा आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाई.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Space Warfare : चीनने अवकाशातही सैन्य उभारले, 360 उपग्रहांमध्ये बसवली शस्त्रे, भारतही सज्ज
या नव्या शोधामुळे स्पेनच्या पुरातत्व इतिहासात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. उल्कापिंडातून आलेल्या धातूचा वापर करून प्राचीन मानवाने केवळ तंत्रज्ञानच नव्हे तर त्याच्याशी जोडलेली सौंदर्यदृष्टी आणि आध्यात्मिकता यांचीही प्रचीती दिली आहे. विलेना खजिना हे केवळ ऐतिहासिक वस्तूंचे संकलन नाही, तर तो माणसाच्या आकाशाशी असलेल्या नात्याचा पुरावा आहे. जो आजही जगाला आश्चर्यचकित करत आहे.