Israel launches massive attack on Iran's Defense Ministry and nuclear headquarters
Israel Iran War News Marathi : तेहरान : मध्य पूर्वेत सुरु असलेला इराण-इस्रायल तणाव आणखी भडकला आहे. १३ जून रोजी इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर युद्ध अधिकच पेटले आहे. शनिवापी रात्री दोन्ही देशांनी एकमेकांवर तीव्र हल्ले केले आहेत. या हल्ल्यात इस्रायलच्या हवाई दलाने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला केला आहे. तर इराणने देखील या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले आहेत.
इस्रायलने तेहरानच्या संरक्षण मंत्रालयाला आणि अणु प्रयोगशाळांना, मुख्यालयांना तसेच दोन रिफायनरीजना लक्ष्य केले आहे. या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. तर या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात्मक कारवाईत इस्रायली बंदर शहर हैफावर क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. याशिवाय इराणने इस्रायलच्या उर्जा पायभूत सुविधांना देखील लक्ष्य केले असल्याचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
इस्रायलच्या १३ जून रोजी अणु तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणने देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे नेतन्याहूंनी संतप्त होत सैन्य अयातुल्ला राजवटीचा प्रत्येक ठिकाणावर हल्ला करण्याचे निर्देश दिले. यानंतर इस्रायली सैन्याने शनिवारी रात्री इराणच्या तेल गॅस उद्योगांवर थेट हल्ला केला. तर इराण देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई सुरु केली.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी,अयातुल्ला राजवटीचा शेवट झाल्याशिवाय आता हे युद्ध थांबणार नाही असे म्हटले आहे. तसेच सैन्याला संबोधित करत इराणच्या प्रत्येक अणु तळांवर आणि अयातुल्लांच्या प्रत्येक लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला करा असे आदेश दिले आहेत.
दरम्यान इस्रायलने पुन्हा हल्ले सुरु केल्याने इराणने अमेरिकेसोबतची अणु चर्चा रद्द केली आहे. इराणचे परराष्ट्री मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलच्या हल्ल्यानंतर चर्चा करणे अयोग्य ठरेल असे म्हटले आहे.
इस्रायलच्या डिफेन्स फोर्सने (IDF)तेहरानमधील इराणी राजवटीच्या अण्वस्र मुख्यालयांवर हल्ले केले. तेसच संरक्षण मंत्रालयालाही उद्ध्वस्त केले आहे. या ठिकामी इराणचे अण्वस्रे ठेवण्यात आली होती असे IDF ने म्हटले आहे. तसेच इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी देखील इराणला शनिवारी गंभीर इशारा दिला होता. इराणने हल्ले न थांबवल्यास तेहरान जळून खाक होई असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या धमकीनंतर शनिवारी रात्री तेहरानमध्ये स्फोटांचे भीषण आवाजा ऐकू येऊ लागले.