
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याचा अमेरिका-इस्रायलला घातक इशारा (Photo Credit- X)
जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी रोखून धरण्याचा इशारा मुज्तबा खामेनेई यांनी दिला आहे. “आम्ही कोणाचेही बलिदान विसरणार नाही. इराणच्या लोकांच्या रक्ताचा, प्रत्येक शहीद आणि निष्पाप मुलाच्या मृत्यूचा हिशोब चुकता केला जाईल,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. विशेषतः मिनाबमधील शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्याबाबत त्यांनी आग्रही भूमिका मांडली.
पश्चिम आशियातील भू-राजकीय स्थितीवर भाष्य करताना खामेनेई म्हणाले की, शेजारील देशांनी आपल्या जमिनीवरून अमेरिकन सैन्याला आणि त्यांच्या तळांना हटवावे. “आम्ही मध्यपूर्वेतील सर्व अमेरिकन तळांना लक्ष्य करू. इराणला आपल्या शेजारील देशांशी मैत्रीपूर्ण संबंध हवे आहेत. आम्ही शेजाऱ्यांवर नव्हे, तर त्यांच्या भूमीवर असलेल्या शत्रूच्या तळांवर हल्ले केले आहेत, कारण तिथून इराणवर हल्ले केले जात होते,” असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
इराणला मोठा झटका! रशिया-चीनने फिरवली पाठ? भारतानेही कंबर कसली, UNSC मध्ये नेमकं काय घडलं?
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याने शत्रूला आर्थिक धडा शिकवण्याचाही इशारा दिला. “जर शत्रूने केलेल्या नुकसानाची भरपाई केली नाही, तर आम्ही त्यांची मालमत्ता जप्त करू. जर ते शक्य झाले नाही, तर शत्रूची मालमत्ता पूर्णपणे उद्ध्वस्त केली जाईल,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. इराणची सेना देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असून शत्रूच्या प्रत्येक हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कठीण काळात इराणच्या पाठीशी उभे राहणाऱ्या मित्रराष्ट्रांचे आणि संघटनांचे खामेनेई यांनी कौतुक केले. “स्वतः संकटात असतानाही हिजबुल्लाहने इराणला मदत केली आहे. आम्ही रेझिस्टन्स फ्रंटला आमचा सर्वात मोठा मित्र मानतो. इराकी रेझिस्टन्सच्या योद्ध्यांनीही आपला निर्धार कायम ठेवला आहे,” असे म्हणत त्यांनी प्रादेशिक मित्रत्वाचा धागा अधोरेखित केला. दरम्यान, अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या तीव्र तणावाच्या पार्श्वभूमीवर मुज्तबा खामेनेई यांचे हे पहिलेच मोठे विधान आहे. कॅमेऱ्यासमोर न येता त्यांनी सरकारी माध्यमातून आपला संदेश जनतेपर्यंत आणि जगापर्यंत पोहोचवला आहे.