Israel-US arms deal Gaza crisis likely to deepen
तेल अवीव/वॉशिंग्टन : गाझामधील संघर्ष अधिक तीव्र होत असताना इस्रायलने अमेरिकेसोबत तब्बल 8.8 अब्ज डॉलर (सुमारे 7500 कोटी रुपये) किमतीचा शस्त्रास्त्र खरेदी करार केला आहे. या करारात 155 मिमी तोफगोळे, हेलफायर AGM-114 क्षेपणास्त्रे आणि 250 किलो वजनाचे घातक बॉम्ब यांचा समावेश आहे. या शस्त्रास्त्रांचा वापर गाझातील युद्धसदृश परिस्थितीत इस्रायलकडून मोठ्या प्रमाणावर केला जाऊ शकतो, त्यामुळे मानवतावादी संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गाझामधील मुस्लिमांविरोधात 3.5 लाखांचा खर्च?
अहवालानुसार, गाझातील एका व्यक्तीला ठार मारण्यासाठी इस्रायल सरासरी 3.5 लाख रुपये खर्च करत आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. इस्रायलच्या या निर्णयामुळे गाझातील मृतांचा आकडा प्रचंड वाढू शकतो. ऑक्टोबर 2023 पासून सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत सुमारे 60,000 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाल्याचे अहवाल सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariff : ट्रम्प यांच्या 27% टॅरिफचा भारतावर होणार ‘असा’ परिणाम; पाहा कोणती उत्पादने महागणार?
7500 कोटींच्या शस्त्रास्त्रांचा गाझातील विनाशासाठी वापर?
गाझामध्ये सध्या सुमारे 21 लाख लोकसंख्या आहे. अमेरिका पुरवठा करत असलेल्या शस्त्रास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग गाझामधील हल्ल्यांसाठी केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. इस्रायलवर सातत्याने शाळा, रुग्णालये आणि नागरी वसाहतींवर हल्ले केल्याचे आरोप होत आहेत. नुकतेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जाहीर केले की, गाझाचा अर्धा भाग काबीज करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. इस्रायली सैन्य त्यानुसार आक्रमण वाढवत आहे. अमेरिका पुरवठा करत असलेल्या तोफगोळे आणि क्षेपणास्त्रांमुळे इस्रायलला अधिक आक्रमक होण्याची संधी मिळणार आहे.
अमेरिकेचा दीर्घकालीन शस्त्र पुरवठा
अमेरिकन माध्यमांच्या अहवालानुसार, हा शस्त्र पुरवठा दीर्घकालीन असणार आहे. काही शस्त्रे अमेरिकेच्या शस्त्रसाठ्यातून थेट इस्रायलला दिली जातील, तर काहींचा पुरवठा एक किंवा अधिक वर्षांनी होईल. यामध्ये 155 मिमी तोफांचे गोळे, हेलफायर क्षेपणास्त्रे आणि 250 किलोचे बॉम्ब यांचा समावेश आहे, जे इस्रायली सैन्यासाठी हवाई हल्ले आणि जमिनीवरील आक्रमण अधिक प्रभावी बनवू शकतात.
इराणशी संबंध? इस्रायलचे पुढचे लक्ष्य कोण?
गाझामधील युद्धावरून लक्ष हटवण्यासाठी इस्रायल इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अमेरिकेने इस्रायलला या मोठ्या प्रमाणावर शस्त्रांचा पुरवठा का केला, याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. इराण आणि अमेरिकेतील तणाव पाहता, या कराराचा संबंध इराणवरील संभाव्य हल्ल्याशी जोडला जात आहे. इस्रायलने पूर्वीही गाझा ते लेबनॉनपर्यंतच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले आहेत. त्यामुळे अमेरिकेकडून दिली जाणारी नवीन शस्त्रास्त्रे केवळ गाझासाठी नव्हे, तर भविष्यातील संभाव्य संघर्षांसाठीही वापरली जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BIMSTEC Summit 2025: BIMSTEC शिखर परिषदेत PM मोदी आणि मोहम्मद युनूस यांचे फोटो का झाले व्हायरल?
मानवतावादी संकट अधिक गडद होणार?
संयुक्त राष्ट्रांनी इस्रायलच्या हल्ल्यांवर तीव्र निषेध नोंदवला असून, या युद्धामुळे गाझातील परिस्थिती अत्यंत भीषण बनली आहे. अन्न, पाणी आणि औषधांच्या तीव्र टंचाईमुळे लाखो लोक भुकेने आणि आजाराने मरत आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल आणि अमेरिकेच्या शस्त्रास्त्र कराराची गंभीर दखल घेण्याची गरज आहे, अन्यथा गाझातील परिस्थिती पूर्णतः बिघडू शकते.