Jailed ex-PM Imran Khan acts against Asim Munir Shahbaz Sharif
Imran Khan against Asim Munir Shahbaz Sharif : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असले तरी त्यांनी केलेल्या दोन हालचालींमुळे देशाच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. एका बाजूला त्यांनी भारताचे नाव घेत पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडले, तर दुसऱ्या बाजूला त्यांनी लंडनस्थित आपल्या दोन मुलांना आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळवण्यासाठी सक्रिय केले. या दोन्ही डावपेचांमुळे शाहबाज शरीफ सरकार आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यावर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानी दैनिक ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’ च्या वृत्तानुसार, इम्रान खान यांनी आदियाला तुरुंगातून दोन महत्त्वाचे संदेश पाठवले आहेत. पहिला संदेश लंडनमधील त्यांच्या मुलांना, तर दुसरा पाकिस्तानमधील पत्रकारांना, जे इम्रानच्या बाजूने लेखन करतात.
इम्रान खान यांनी पहिल्या संदेशात पाकिस्तान सरकारवर मानसिक लढाईत अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, युद्धस्थितीत ६० टक्के लढाई मानसिक पातळीवर लढली जाते, आणि भारत यामध्ये अग्रेसर आहे. त्यांनी म्हटले की, “भारत पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहे, आणि तरीही पाकिस्तान सरकार युद्धबंदीचा आनंद साजरा करत आहे.” ते पुढे म्हणाले की, “सरकार जनतेच्या हितासाठी नाही, त्यामुळे जनतेने आता रस्त्यावर उतरून या सरकारविरोधात उठाव करावा.” या विधानातून इम्रानने एकप्रकारे सत्ताधाऱ्यांविरुद्ध जनआंदोलनाची हाक दिली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पुन्हा दहशतवादी छावण्या उभारणार…’ शाहबाज शरीफ यांनी खुली केली देशाची तिजोरी
दुसऱ्या संदेशात, इम्रान खान यांनी लंडनमध्ये असलेल्या आपल्या दोन्ही मुलांना त्याच्या सुटकेसाठी जागतिक पातळीवर आवाज उठवण्यास सांगितले. या संदेशानंतर दोघेही मुलगे सक्रिय झाले असून त्यांनी विदेशी मीडियाला मुलाखती देऊन पाकिस्तानमधील लोकशाहीची स्थिती उजेडात आणली आहे.
त्यांनी मुलाखतीत सांगितले, “पाकिस्तानमध्ये सध्या खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात नाही. आमचे वडील अन्यायकारकपणे तुरुंगात आहेत. आम्ही जगभरातील लोकशाहीवादी देशांकडून मदतीची मागणी करत आहोत.” त्यांनी हेही स्पष्ट केले की, “पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. ही दीर्घकालीन लढाई असेल.”
इम्रान खान तुरुंगात गेले असले तरी, त्यांच्या लोकप्रियतेत कोणतीही घट झाली नाही. खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि गिलगिट-बाल्टिस्तान या भागांमध्ये त्यांच्या पक्षाचा प्रभाव आजही तितकाच आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “इम्रान खान यांची कारागृहातूनही जनतेवर पकड आहे”, आणि हेच त्यांचे मुख्य राजकीय भांडवल आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इम्रान खान यांचा मुलगा लवकरच एक संगठित मोहीम चालवणार आहे, जी सोशल मीडियावरून चालवली जाईल. या मोहिमेद्वारे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारविरोधात दबाव निर्माण केला जाईल. हे सगळं लक्षात घेता, इम्रान खान तुरुंगात असले तरी पाकिस्तानच्या राजकीय नकाशावर त्यांची छाया अजूनही स्पष्टपणे दिसत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्धबंदीचे श्रेय घेण्यात अमेरिका पुढे पण पाकिस्तानच्या ‘दहशतवादी संबंधांवर’ मात्र का बोलती बंद?
इम्रान खान यांच्या या दोन हालचालींमुळे पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांसमोर नव्या समस्या उभ्या राहण्याची शक्यता आहे. त्यांनी भारताचा संदर्भ देत सरकारला आंतरराष्ट्रीय पातळीवर अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, तर त्यांच्या मुलांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवून पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाला जागतिक वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. येत्या काही दिवसांत या रणनीतीचा परिणाम कितपत प्रभावी ठरेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.