Karachi water crisis Pipeline burst floods university 40% supply cut
Pipeline burst Karachi University : आर्थिक, राजकीय व सुरक्षा संकटात सापडलेल्या पाकिस्तानसमोर आता भीषण जलसंकटाने डोके वर काढले आहे. कराचीत मंगळवारी झालेल्या ८४ इंचाच्या मुख्य पाईपलाइनच्या स्फोटामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला आहे. कराची विद्यापीठाच्या संपूर्ण परिसरात पाणी घुसले असून, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या घरांना पाण्याने वेढले आहे. परिणामी, कराचीत येत्या काही दिवसांत ४०% पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
या दुर्घटनेमुळे कराचीत लियाकताबाद, नाझिमाबाद, लांधी, कोरंगी, चानासर टाउन, जुने शहर क्षेत्र आणि PAF बेस मसरूर या भागांना सर्वाधिक फटका बसणार आहे. कराचीला दररोज सुमारे १२०० दशलक्ष गॅलन पाण्याची आवश्यकता असते. मात्र आता केवळ ४०० दशलक्ष गॅलन पाणीपुरवठाच शक्य होणार आहे. ही कपात पुढील ९६ तासांपर्यंत लागू राहील, अशी माहिती कराची वॉटर अँड सीवरेज कॉर्पोरेशन (KWSC) ने दिली आहे.
मूळ स्फोट कराची विद्यापीठातील ८४ इंच व्यासाच्या पाइपलाइनमध्ये गळतीमुळे झाला. ही पाइपलाइन KWSC च्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा भाग होती. गळती इतकी तीव्र होती की संपूर्ण विद्यापीठ परिसरात जलसंचय झाला आणि प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांमध्येही पाणी घुसले. यामुळे शैक्षणिक कार्यात व्यत्यय निर्माण झाला असून, स्थानिक प्रशासन दुरुस्तीच्या कामाला लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या ‘डर्टी वर्क’च्या विधानावर अमेरिकेची प्रतिक्रिया; पाक आता जागतिक पातळीवर अडचणीत
या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सिंधू पाणी करारावर पुनर्विचार सुरू केला आहे. काश्मीरच्या पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर भारताकडून कडक नियंत्रण ठेवण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत कराचीसारख्या शहरात जर पाणी साठवण्याची किंवा वाटपाची योग्य यंत्रणा नसेल, तर लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.
आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असलेला पाकिस्तान आधीच महागाई, वाढते परकीय कर्ज, रोजगाराचा अभाव आणि अन्नसुरक्षेच्या समस्यांनी त्रस्त आहे. यामध्येच जलसंकट आणि पाईप स्फोटाची घटना म्हणजे जणू ‘गरीबी में आटा गीला’ झाल्यासारखी परिस्थिती झाली आहे. शहरातील नागरिक आधीच पाण्याची काटकसरीने बचत करत होते, पण आता ते उरलेले पाणीही नाल्यांमध्ये वाहून गेले आहे, हे पाहून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
या घटनेने पाकिस्तानमधील पायाभूत सुविधांची दयनीय अवस्था स्पष्ट झाली आहे. ना योग्य पाणी व्यवस्थापन धोरण, ना देखभालीची कार्यक्षम व्यवस्था हीच वास्तवातील स्थिती आहे. यामुळे केवळ कराचीच नव्हे, तर संपूर्ण पाकिस्तानला आगामी काळात गंभीर जलसमस्यांचा सामना करावा लागणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पाकिस्तानी सेना बाबरी मशिदीची पहिली वीट रचेल… ‘ बिलावल भुट्टोनंतर पाकिस्तानच्या आणखी एका खासदाराने गरळ ओकली
या संपूर्ण घटनेतून स्पष्ट होते की, पाकिस्तानसारखा देश जेव्हा राजकीय, आर्थिक आणि पर्यावरणीय सर्वच आघाड्यांवर कमकुवत बनतो, तेव्हा एका पाईपलाइनच्या फुटीमुळेही राष्ट्रव्यापी संकट उद्भवते. कराचीत उद्भवलेले हे जलसंकट फक्त एका शहरापुरते मर्यादित राहणार नसून, ते देशाच्या व्यवस्थापन क्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. पाण्याच्या थेंबासाठी सुरू झालेला संघर्ष आता अधिक भीषण रूप धारण करतो आहे.