बांगलादेशी हिंदूंच्या समर्थनावरून 'या' दोन ब्रिटीश भारतीयांचा किंग चार्ल्स तिसरे यांनी सन्मान काढून घेतला
लंडन: बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात अनेक देशातील हिंदूं समुदायातील लोकांनी विरोध दर्शवला. दरम्यान ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांनी ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या दोन ब्रिटिश नेत्यांचा प्रतिष्ठित सन्मान परत घेतल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. या दोन नेत्यांमध्ये उद्योगपती लॉर्ड रामी रेंजर आणि हिंदू कौन्सिल यूकेचे मॅनेजिंग ट्रस्टी अनिल भनोट यांचा समावेश आहे. बांगलादेशी हिंदूंच्या मुद्द्यावर मांडलेले मत आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन यामुळे या नेत्यांकडून सन्मान काढून घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लंडन गॅझेट’मध्ये याची घोषणा करण्यात आली असून दोन्ही भारतीयांना त्यांचे चिन्ह बकिंघम पॅलेसमध्ये परत करण्यास सांगण्यात आले आहे. त्याच वेळी उद्योगपती लॉर्ड रामी रेंजर आणि हिंदू कौन्सिल यूकेचे मॅनेजिंग ट्रस्टी अनिल भनोट यांनी याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी हा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचे म्हटले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या- चीनची तैवानविरोधात उकसवणारी कारवाई; लष्करी हालचालींवर तणाव वाढला
किंग चार्ल्स यांनी कोणता सन्मान परत घेतला?
लॉर्ड रामी रेंजर यांना सीबीई कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर आणि अनिल भनोट यांना ओबीई ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर या सन्मानाने गौरवण्यात आले होते. मात्र, आता बकिंघम पॅलेसकडून त्यांना त्यांचे प्रतीक चिन्ह परत करण्यास सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल भनोट यांनी सांगितले की, 2021 मध्ये बांग्लादेशात हिंदू मंदिरांवर हल्ले होत असताना त्यांनी त्याबाबत आवाज उठवला होता.
अनिल भनेट यांनी म्हटले की,’आपल्या मंदिरांवर हल्ले होत होते, हिंदूंना लक्ष्य केले जात होते, पण माध्यमांनी यावर फारसे भाष्य केले नाही. मला वाटले की हा विषय मांडणे गरजेचे आहे.’ त्यांनी असा आरोप केला की, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला जात असून त्यांची बाजू ऐकून न घेताच निर्णय घेण्यात आला आहे. लॉर्ड रामी रेंजर यांनी देखील या निर्णयाला अन्यायकारक ठरवत न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितले. रेंजर यांना 2015 साली महाराणी एलिझाबेथ यांनी ब्रिटिश व्यापार आणि आशियाई समुदायासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानित केले होते.
सन्मान परत घेण्याचा निर्णय का?
ब्रिटनच्या सन्मान प्रणालीच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने सन्मान प्रणालीला अपमानित करणारी कृती केली, असे मानले गेले, तर सन्मान परत घेता येतो. किंग चार्ल्स यांना हे प्रस्ताव ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टारमर यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते. हा निर्णय अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात असल्याचे दोघांचे म्हणणे आहे. ब्रिटनमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त एक कल्पनारम्य विधान बनले आहे, अशी टीका अनिल भनोट यांनी केली. त्यामुळे या प्रकरणाची पुढील न्यायालयीन लढाई महत्त्वाची ठरणार आहे.