जो बायडेन आणि झेलेन्सकी(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
वॉश्गिंटन: अमेरिका पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांनी जाहीर केले आहे की, युक्रेनला जवळपास एक अब्ज डॉलर्सची अतिरिक्त मदत दिली जाईल. ही मदत अमेरिका काँग्रेसद्वारे मंजूर करण्यात आलेल्या निधीचा वापर करून बायडेन प्रशासनाने युद्धग्रस्त युक्रेनला अधिक सक्षम करण्याच्या हेतूने दिली जाणार आहे. विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्यापूर्वी ही रक्कम खर्च करण्यावर भर दिला जात आहे.
यूक्रेनला शस्त्रांची तातडीची गरज
मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनला या नवीन मदतीत ‘हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टम’ (HIMARS), ड्रोन आणि युद्धसाहित्यही पुरवले जाणार आहे. या शस्त्रास्त्रांची युक्रेनला सध्या खूप गरज आहे. ही मदत ‘युक्रेन सिक्युरिटी असिस्टन्स इनिशिएटिव्ह’च्या माध्यमातून दिली जाणार आहे. या उपक्रमाद्वारे पुरवले जाणारे शस्त्रसामान युक्रेनच्या लष्करी क्षमतेला दीर्घकालीन बळकटी देण्यास उपयुक्त ठरते. यामुळे युद्धाच्या बूमीवर तातडीने बदल घडत नसला तरी, भविष्यातील सुरक्षेसाठी ही मदत महत्त्वाची ठरते.
अमेरिका याआधीही मदत केली होती
अमेरिकेने युक्रेनला, 2022च्या रशियाच्या आक्रमणानंतर62 डॉलर्सची लष्करी मदत केली होती. ऑस्टिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन मदत देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्याचवेळी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील पुढील प्रशासन युक्रेनला सैनिकी मदत सुरू ठेवेल का, याबाबत विचारले असता, ऑस्टिन म्हणाले की, “सध्याच्या प्रशासनाने हा निर्णय स्वबळावर घेतला आहे. पुढील प्रशासन मदत सुरू ठेवायची की नाही, याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला जाईल.”
रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी ट्रम्प यांची नवीन योजना
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देश प्रभावित झाले आहेत. हे दीर्घकाळ चालणारे युद्ध थांबवणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी एक नवीन योजना आखली आहे. ट्रम्प यांनी निवृत्त जनरल किथ केलॉग यांची रशिया आणि युक्रेन युद्धाबाबत विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
आता रशिया-युक्रेन युद्धावरील विशेष दूत या नात्याने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेले युद्ध संपविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारात युक्रेन युद्ध संपवण्याची घोषणा केली होती, ती पूर्ण करण्याची जबाबदारी ट्रम्प यांनी कीथ केलॉग यांच्यावर सोपवली आहे.