चीनमध्ये खळबळ! उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना अटक, परराष्ट्र मंत्रिपदाच्या होते शर्यतीत
बीजिंगमधील अधिकाऱ्यांनी चीनचे उच्चपदस्थ राजदूत लिऊ जियानचाओ यांना ताब्यात घेतलं आहे. लिऊ जियानचाओ चीनच्या परराष्ट्र धोरणांमधील मुख्य चेहरा मानले जातात आणि परराष्ट्र मंत्रिपदाच्या शर्यतीत देखील होते. या मोठ्या राजकीय घडामोडींदरम्यान परराष्ट्र दौऱ्यावरून परतल्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आल्यामुळे चीनमध्ये खळबळ माजली आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, चीन सरकारच्या राज्य परिषद माहिती कार्यालयाने आणि कम्युनिस्ट पक्षाच्या आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाने यावर प्रतिसाद दिला नाही.
लिऊ जियानचाओ हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या विभागाचे प्रमुख आहेत, जे परदेशी राजकीय पक्षांशी संबंध व्यवस्थापित करतात. २०२२ मध्ये ही जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांनी २० हून अधिक देशांना भेटी दिल्या आहेत आणि १६० हून अधिक देशांच्या अधिकाऱ्यांना भेटले आहेत.
खरं तर, लिऊ यांच्या व्यस्त परराष्ट्र दौऱ्यांमुळे आणि विशेषतः वॉशिंग्टनमध्ये माजी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांच्याशी झालेल्या बैठकींमुळे अशा अटकळाला उधाण आले होते की परराष्ट्र मंत्रालयाचे माजी प्रवक्ते लिऊ यांना पुढील परराष्ट्र मंत्री बनवण्याची तयारी सुरू आहे. लिऊ यांच्या अटकेला आतापर्यंतची सर्वोच्च पातळीवरील राजनैतिक चौकशी म्हणून पाहिले जात आहे.
२०२३ च्या सुरुवातीला चीनने राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या किन गँग यांना परराष्ट्र मंत्रीपदावरून काढून टाकले. त्यावेळी किन गँगबद्दल विवाहबाह्य संबंधांच्या अफवा पसरल्या होत्या.
चीनच्या ईशान्य प्रांत जिलिनमध्ये जन्मलेल्या लिऊ जियानचाओ यांनी बीजिंग फॉरेन स्टडीज विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदवी प्राप्त केली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात अनुवादक म्हणून पहिले पद स्वीकारले.
लिऊ यांनी ब्रिटनमधील चिनी मिशनमध्ये आणि नंतर इंडोनेशिया आणि फिलीपिन्समध्ये राजदूत म्हणून काम केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून, ते त्यांच्या स्पष्ट आणि कधीकधी विनोदी उत्तरांसाठी ओळखले जात होते आणि त्यांना चिनी हितसंबंधांचे कट्टर समर्थक देखील मानले जात असे.