London shaken Indian restaurant set on fire five injured 15-year-old boy arrested
London Indian restaurant fire : परदेशात राहणाऱ्या भारतीय समाजाला हादरवून टाकणारी धक्कादायक घटना लंडनमध्ये घडली आहे. शहरातील गँट्स हिल परिसरातील वुडफोर्ड अव्हेन्यूवर असलेल्या लोकप्रिय ‘इंडियन अरोमा’ या भारतीय रेस्टॉरंटला काही अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य करून आग लावली. त्या वेळी रेस्टॉरंटमध्ये शेकडो ग्राहक जेवत होते. अचानक पेटलेल्या आगीतून वाचण्यासाठी लोक धावाधाव करत बाहेर पडत होते. या हल्ल्यात किमान पाच जण भाजले असून त्यापैकी एका महिला आणि एका पुरुषाची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही युवक रेस्टॉरंटमध्ये शिरताना दिसतात. त्यांनी हातातील बाटल्यांमधील ज्वलनशील द्रव्य (पेट्रोलसदृश) जमिनीवर फेकले आणि काही क्षणांतच भीषण आग पेटली. काही सेकंदांतच ज्वाळांनी संपूर्ण रेस्टॉरंट वेढून टाकले. घाबरलेले लोक जीव वाचवण्यासाठी ओरडत बाहेर पळत होते. अनेक ग्राहकांच्या अंगावर आगीचे ठिणगे पडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…
या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि १५ वर्षीय मुलासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागचे कारण नेमके काय, हे अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासात मात्र हा पूर्वनियोजित हल्ला असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने माध्यमांशी बोलताना सांगितले “आग लागल्यानंतर मी एक माणूस अंगावर ज्वाळा पेटलेल्या अवस्थेत धावताना पाहिला. लोक किंचाळत होते. माझा मित्र धावत जाऊन पाण्याची बादली घेऊन आला. आम्ही जीव तोडून आग विझवण्याचा प्रयत्न करत होतो. तो प्रसंग डोळ्यांसमोरून जातच नाही.”
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास ९० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग आटोक्यात आणण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेनंतर आणखी दोन जण जखमी अवस्थेत दिसले होते, मात्र ते अधिकारी येण्यापूर्वीच घटनास्थळ सोडून गेले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या हल्ल्यात तीन महिला व दोन पुरुष जखमी झाले आहेत. त्यापैकी एक महिलेची आणि एका पुरुषाची प्रकृती गंभीर आहे. उर्वरितांना किरकोळ भाजल्या गेलेल्या आहेत, तरीही धक्क्यामुळे त्यांची मानसिक अवस्था खालावली आहे.
लंडनमधील भारतीय समुदाय या घटनेमुळे चांगलाच हादरला आहे. ‘इंडियन अरोमा’ हे रेस्टॉरंट स्थानिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रोहित कालुवाला या उद्योजकाने हे रेस्टॉरंट उभारले असून तेथील पारंपारिक भारतीय जेवणासाठी अनेक परदेशी ग्राहकही मोठ्या संख्येने येतात. अशा ठिकाणी घडलेला हल्ला जातीय द्वेषातून झाला का? हा प्रश्न भारतीय समुदायाला सतावतो आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India warns Pakistan : पहलगाम हल्ल्यांनंतर भारताने प्रथमच साधला पाकिस्तानशी थेट संवाद; दिला सावधानतेचा इशारा
अलिकडच्या काळात परदेशात भारतीयांवर हल्ल्यांच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच कॅनडा व आयर्लंडमध्येही अशाच प्रकारच्या घटना घडल्या होत्या. मात्र लंडनमधील या घटनेने परिस्थिती किती गंभीर व असुरक्षित होत चालली आहे, याचे चित्र उघड केले आहे. भारतीय समुदायाने स्थानिक प्रशासनाकडे आपल्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
ही घटना केवळ लंडनमधील भारतीय समुदायालाच नाही, तर जगभरातील भारतीयांना अस्वस्थ करणारी आहे. एका लोकप्रिय भारतीय रेस्टॉरंटवर असा जीवघेणा हल्ला होणे ही केवळ गुन्हेगारी कारवाई नसून, परदेशात भारतीयांबाबत वाढत चाललेल्या असुरक्षिततेचे द्योतक आहे. आगामी काळात अशा घटना रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.