अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते; मग ट्रम्प भारतावर दबाव का आणतात? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India 3rd-largest oil consumer : जगाच्या अर्थव्यवस्थेत तेल हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. औद्योगिक क्षेत्रापासून ते वाहतूक, संरक्षण क्षेत्रापासून ते ऊर्जा उत्पादनापर्यंत प्रत्येक ठिकाणी तेलाशिवाय जगाची गाडी पुढे सरकू शकत नाही. त्यामुळेच तेलाला “ब्लॅक गोल्ड” म्हणजेच काळे सोनं म्हटलं जातं. या काळ्या सोन्याच्या बाजारात भारत, अमेरिका, चीन आणि रशिया हे मोठे खेळाडू आहेत. भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल वापरणारा देश आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका तर दुसऱ्या स्थानावर चीन आहे. भारताला त्याच्या कच्च्या तेलाच्या गरजेच्या तब्बल ८५ टक्के आयात करावी लागते. म्हणजेच भारत जवळजवळ परावलंबी आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच भारतावर कठोर भूमिका घेतली आहे. त्यांचे म्हणणे आहे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियन अर्थव्यवस्थेला आधार देतो. याच कारणामुळे त्यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. एवढ्यावरच न थांबता, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यास २५ टक्के दंड लावण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली आहे.
पण प्रश्न असा आहे की – जेव्हा अमेरिकाच भारताकडून रिफाइंड तेल खरेदी करते, तेव्हा ट्रम्प इतका गोंधळ का घालत आहेत?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आमचे भविष्य, आम्हीच ठरवणार…’ युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; स्वातंत्र्यदिनानिमित्त झेलेन्स्कीचा निर्भीड संदेश
भारत कच्चे तेल आयात करून त्याचे रिफायनिंग करतो आणि नंतर ते शुद्ध पेट्रोलियम उत्पादने इतर देशांना विकतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारताकडून शुद्ध पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिकाही समाविष्ट आहे! त्याशिवाय युरोपियन युनियन, नेदरलँड्स, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युएई, दक्षिण आफ्रिका असे अनेक देश भारताकडून पेट्रोलियम उत्पादने खरेदी करतात. विशेष म्हणजे भारताकडून सर्वाधिक तेल खरेदी करणाऱ्या देशांमध्ये युरोपियन देश पहिल्या क्रमांकावर आहेत.
युक्रेन युद्धानंतर पाश्चात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातली. त्यावेळी भारताने आपली रणनीती बदलली आणि रशियाकडून तेल खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढवली. २०२५ मध्ये भारताने रशियाकडून तब्बल ५० अब्ज डॉलर्सचे कच्चे तेल खरेदी केले. आतापर्यंत भारताने रशियाकडून मिळून १४३ अब्ज डॉलर्सचे तेल खरेदी केले आहे. यामुळेच पश्चिमी देश भारताकडे संशयाने पाहतात. मात्र भारताचा दावा आहे की आम्ही आमच्या राष्ट्रीय हितासाठी स्वस्त दरात तेल घेतो, आणि त्यात काही चुकीचे नाही. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी तर स्पष्ट शब्दांत सांगितले.
“जर कोणाला भारताकडून तेल खरेदी करायचे नसेल, तर त्यांनी करू नये. आम्ही कोणालाही सक्ती करत नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Weapons Factories : ‘आम्ही अनेक देशांमध्ये उभारल्या आहेत वेपन फॅक्टरी’ वेळ आल्यावरच उघड करू; इराणचा वादग्रस्त दावा
भारत केवळ रशियावर अवलंबून नाही. सध्या भारत ४० हून अधिक देशांकडून तेल खरेदी करतो. त्यात मुख्यतः –
सौदी अरेबिया
युएई
अमेरिका
नायजेरिया
कुवेत
मेक्सिको
ओमान
इराक
युक्रेन युद्धापूर्वी भारताने इराककडून सर्वाधिक तेल आयात केले होते. मात्र युद्धानंतर परिस्थिती बदलली आणि रशिया भारताचा मोठा पुरवठादार ठरला.
भारत कच्च्या तेलाच्या उत्पादनात खूपच मागे आहे. आसाम, राजस्थान, गुजरात, मुंबईचे किनारी भाग आणि वेस्टर्न ऑफशोअर भागात थोडेफार साठे आहेत. पण हे देशाच्या गरजांच्या तुलनेत अत्यल्प आहेत. तथापि, अंदमान समुद्रात प्रचंड तेलसाठे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जर हे प्रत्यक्षात आले तर भारताची आयातीवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होऊ शकेल.
आजचा तेलबाजार हा फक्त व्यापार नाही तर भूराजकारण (Geopolitics) बनला आहे. भारताने आपल्या हितासाठी स्वस्त रशियन तेल खरेदी करणे हे वास्तव आहे, पण त्याच वेळी भारताचं शुद्ध पेट्रोलियम खरेदी करणाऱ्यांमध्ये अमेरिका आणि युरोपसारखे देशही आहेत. म्हणूनच ट्रम्पसारख्या नेत्यांच्या आरोपांना भारताने ठाम उत्तर देत आपला मार्ग निवडणे गरजेचे आहे. कारण आजच्या काळात तेल म्हणजे फक्त ऊर्जा नाही, तर राष्ट्राची आर्थिक सुरक्षा आहे.