India warns Pakistan : पहलगाम हल्ल्यांनंतर भारताने प्रथमच साधला पाकिस्तानशी थेट संबंध; दिला सावधानतेचा इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
India warns Pakistan : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी गडद झाला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भारताने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत शेजारील देशाला गंभीर इशारा दिला आहे. जम्मूतील तावी नदीला पूर येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून त्याचे परिणाम थेट पाकिस्तानातही जाणवतील, अशी माहिती भारत सरकारने इस्लामाबादला दिली आहे. भारताच्या या इशाऱ्यानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. या कराराच्या माध्यमातून भारतातून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी पाकिस्तानात जात असते. त्यामुळे या करारावरील स्थगितीमुळे पाकिस्तानला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, भारताने पहिल्यांदाच ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानशी थेट संवाद साधला. मात्र हा संवाद दहशतवादाविरुद्ध नव्हता, तर पूराच्या संभाव्य धोक्याबाबत शेजाऱ्याला सावध करण्यासाठी होता. या निर्णयामुळे भारताने स्पष्ट संदेश दिला की, राजकीय आणि लष्करी संघर्ष वेगळा असला तरी मानवतेच्या रक्षणासाठी भारत कधीही मागे हटणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Market : अमेरिकाही भारताकडून तेल खरेदी करते मग तरीही ट्रम्प का आहेत खार खाऊन? वाचा सविस्तर…
भारतातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला सांगण्यात आले आहे की जोपर्यंत ते सीमापार दहशतवाद थांबवण्यासाठी ठोस पावले उचलत नाहीत, तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहील. यामुळे पाकिस्तानची स्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पाकिस्तानने या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय लवाद न्यायालयात धाव घेतली असली तरी भारताने ठामपणे सांगितले आहे की हा विषय द्विपक्षीय चर्चेपुरताच मर्यादित आहे. कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थेचा निर्णय स्वीकारण्याची भारताची तयारी नसल्याचेही भारताने स्पष्ट केले.
दरम्यान, पाकिस्तानात सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाब प्रांतात पाऊस आणखी ४८ तास सुरू राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. परिणामी सिंधू, चिनाब, रावी, सतलज आणि झेलम या प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पाकिस्तानातील पंजाब आपत्कालीन बचाव सेवा ११२२ चे प्रवक्ते फारुख अहमद यांनी सांगितले की, गेल्या २४ तासांत कसूर, ओकारा, पाकपट्टण, बहावलनगर आणि वेहारी या जिल्ह्यांमधील अनेक खेड्यांमधून २०,००० हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाणी शिरल्यामुळे अनेक गावे पूर्णपणे वेढली गेली असून नागरिकांना सततच्या भीतीत दिवस काढावे लागत आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली असली तरी, सामान्य नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी दिलेला हा पूर इशारा भारताच्या जबाबदार धोरणाचे उदाहरण ठरला आहे. मानवतेच्या प्रश्नावर भारत कधीही तडजोड करणार नाही, असा संदेश या निर्णयातून दिला गेला आहे. यामुळे एका बाजूला पाकिस्तानवर दहशतवाद रोखण्याचा दबाव वाढला आहे, तर दुसऱ्या बाजूला पूरस्थितीमुळे तेथील सरकार अडचणीत सापडले आहे. भारताकडून मिळालेल्या या इशाऱ्यामुळे पाकिस्तानच्या प्रशासनात घबराट पसरली असून, तातडीने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘आमचे भविष्य, आम्हीच ठरवणार…’ युक्रेनचा रशियाच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला; स्वातंत्र्यदिनानिमित्त झेलेन्स्कीचा निर्भीड संदेश
सध्या भारत-पाकिस्तान संबंध अतिशय तणावपूर्ण आहेत. पहलगाम हल्ल्यामुळे निर्माण झालेला अविश्वास वाढतच चालला आहे. अशा वेळी भारताने पूराचा इशारा देऊन दाखवून दिले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढा आणि मानवतेचा विचार – हे दोन्ही एकत्र शक्य आहेत. या कृतीतून पाकिस्तानला केवळ कठोर संदेशच मिळाला नाही तर जगासमोर भारताची संवेदनशील बाजूही अधोरेखित झाली आहे.