Mohammad Yunus seized power with the help of terrorists, says Former PM Sheikh Hasina
ढाका: सध्या बांगलादेशात राजकीय गोंधळ सुरु आहे. युनूस यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरु होती, परंतु त्यांनी या चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. मोहम्मद युनूस यांनी ते राजीनाम देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याच दरम्यान माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मोहम्मद युनूस यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. शेख हसीना यांनी अंतिरम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दहशतवाद्यांच्या बळावर सत्ता काबीज केली होती असा गंभीर आरोप शेख हसीना यांनी केला आहे.
शेख हसीना यांनी म्हटले आहे की, युनूस यांनी सत्ता ताब्यात घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या दहशतवाद्यांची मदत घेतली आहे. या दहशतवाद्यांपासून आम्ही बांगलादेशच्या नागरिकांना संरक्षण दिले होते. अनेक दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली आणि त्यांना तुरुंगात टाकले होते. परंतु युनूस यांनी सर्वांना मुक्त केले आणि हे दहशतवादी सध्या बांगलादेशात राज्य करत आहे.
आपल्या राष्ट्राचे संविधान दीर्घ संघर्षानंतर आपल्याला प्राप्त झाले आहे. या संविधानाला हात लावण्याचा आणि बेकायदेशीरपणाने सत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार कोणी दिला? युनूस यांनी मुख्य सल्लागार पदावर राहण्याचा काहीही अधिकारी नाही. असा कोणताही अधिकार अस्तित्त्वात नाही. अशा परिस्थितीत ते संसदेशिवाय कायदा बदलू शकत नाहीत, असे झाल्यास त्याला बेकादेशीर कृत्य मानण्यात येईल.
शेख हसीना यांच्या त्यांच्या वडिलांच्या काळाची आठवण करुन दिली. त्यांनी म्हटले की, अमेरिकेला त्या काळात सेंट मार्टिन बेट हवे होते, परंतु माझ्या वडिलांनी शेख मुजीबुर रहमान यांनी अमेरिकेची ही ऑफर मान्य केली नाही. यासाठी त्यांनी आपले बलिदान दिले. त्यांनी देशातील ३० लाख लोकांना मुक्त करण्यासाठी लढा दिला. पण आज युनूनस बांगलादेश अमेरिकेला विकत आहेत. हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे की, अशी व्यक्ती सत्तेवर आली आहे.
सध्या बांगलादेशात अंतरिम सरकारच्या पाय उताराची तयारी सुरु आहे. लष्कर आणि बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP)ने डिसेबंरपर्यंत निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. तसेच युनूस यांना निवडणुका न लढवता सत्तेत राहायचे असल्याचा आरोप केला जात आहे.
जुलै २०२४ पासून कोटाविरोधात आंदोलन सुरु झाले, त्यानंतर बांगलादेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी शेख हसीना यांनी आपले राहते घर सोडून पळावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. तेव्हापासून त्या भारतात आहेत. शेख हसीना यांच्या देश सोडून जाण्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्त्वाखाली अंतरिम सरकार स्थापन झाले. तेव्हापासून देशांत राजकीय गोंधळ सुरुच आहे.