Musk's daughter admits she doesn't know her siblings shocking the world
नवी दिल्ली : जगभरात नावाजलेले उद्योगपती आणि स्पेसएक्स, टेस्ला, तसेच एक्स (Twitter) चे मालक इलॉन मस्क पुन्हा एकदा कौटुंबिक वादांमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या ट्रान्स कन्या विवियन जेना विल्सन हिने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. तिने सांगितले की, “मला किती भाऊ-बहिणी आहेत हेच माहित नाही.” तसेच गेल्या पाच वर्षांपासून वडिलांशी कोणताही संपर्क नाही, असेही तिने स्पष्ट केले. विवियनने टीन वोगला दिलेल्या मुलाखतीत तिच्या वडिलांबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या आहेत. ती सध्या टोकियो, जपानमध्ये वास्तव्यास आहे आणि आर्थिकदृष्ट्या मस्कवर अवलंबून नाही, असेही तिने स्पष्ट केले.
विवियन आणि इलॉन मस्क यांच्यातील नातेसंबंध अत्यंत ताणले गेले आहेत. ती म्हणाली, “गेल्या पाच वर्षांत मी वडिलांशी कोणतीही चर्चा केलेली नाही.” एवढेच नाही, तर तिने आपल्या वडिलांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वरून संपूर्णपणे काढता पाय घेत थ्रेड्स आणि ब्लूस्की या प्लॅटफॉर्मवर आपली उपस्थिती वाढवली आहे. ती म्हणते, “मी बातम्यांमध्ये वाचते की ते काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करतात. मला वाटते की हे मूर्खपणाचे आहे आणि मी त्याचा निषेध केला पाहिजे, आणि मी तसे अनेकदा केले आहे.” यावरून स्पष्ट होते की, विवियन आणि मस्क यांच्यातील दुरावा प्रचंड वाढलेला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : T Coronae Borealis: ब्रह्मांडात होणार मोठा स्फोट, पृथ्वीवरूनही दिसणार ‘हे’ विलोभनीय दृश्य; जाणून घ्या दिवस आणि वेळ
इलॉन मस्क हे जगातील सर्वात प्रभावशाली आणि श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. मात्र, त्यांच्या कन्येला याचा काहीही परिणाम होत नाही. ती म्हणते, “मला त्यांच्याबद्दल कोणताही आदर वाटत नाही, ना मी त्यांना घाबरते. ते श्रीमंत आहेत म्हणून मी घाबरू का? ते ट्विटरचे मालक आहेत, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन, पण त्याने काही फरक पडत नाही.”
विवियनने तिच्या राजकीय विचारसरणीबद्दलही परखड भूमिका मांडली. ती डाव्या विचारसरणीची असल्याचे स्पष्टपणे सांगते. ती म्हणते, “मला मोफत आरोग्यसेवा महत्त्वाची वाटते. अन्न, निवारा आणि पाणी हे मूलभूत मानवी हक्क आहेत. अमेरिका सध्या संपत्तीच्या असमानतेच्या मोठ्या समस्येला तोंड देत आहे, आणि हे आमच्या पिढीसाठी सर्वात मोठे आव्हान आहे.” इलॉन मस्क यांच्या राजकीय विचारसरणीच्या विरोधात तिचे विचार असल्याचे यातून स्पष्ट होते. मस्क अनेकदा डाव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असतात, त्यामुळेच त्यांची स्वतःची कन्या त्यांच्यावर टीका करत असल्याने हा विषय अधिक चर्चेचा ठरत आहे.
विवियनने मस्कच्या कुटुंबातील गोंधळाबाबतही उघडपणे भाष्य केले. ती म्हणाली, “माझे किती भाऊ-बहिणी आहेत, हेच मला माहित नाही!” इलॉन मस्कच्या अनेक संतती वेगवेगळ्या महिलांकडून जन्माला आल्या आहेत, आणि त्या संदर्भात खुद्द त्याच्या मुलीलाच अंधारात ठेवले जात असल्याचे दिसते.
दरम्यान, लेखिका ऍशले सेंट क्लेअर यांनी अलीकडेच दावा केला की, त्यांनी 2024 मध्ये मस्कच्या मुलाला जन्म दिला आहे. मात्र, यानंतर दोघांमध्ये मतभेद झाले असून, क्लेअरने मस्कवर “गैरहजर पिता” असल्याचा आरोप केला आहे. तसेच, तिने एकल पालकत्वासाठी अर्ज केल्यानंतर मस्कने आर्थिक पाठबळ कापले असल्याचाही आरोप केला आहे.
इलॉन मस्क यांनी आजवर अनेक उद्योग उभे केले, पण त्यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्य मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहे.
विशेष म्हणजे, मस्कने यापूर्वी सांगितले होते की, ट्रान्स लोकांविषयी त्यांच्या विचारांमुळे विवियनने त्यांच्याशी नाते तोडले आहे. त्यांनी काही वेळा ट्रान्स अधिकारांविषयी टीका केली होती, त्यामुळेच त्यांची स्वतःची मुलगी त्यांच्यापासून दूर गेली असल्याचे मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ॲमेझॉनच्या जंगलात सापडला पृथ्वीवरील सर्वात लांब ॲनाकोंडा; शास्त्रज्ञांच्या ‘या’ शोधाने जग हादरले
इलॉन मस्क यांचे नाव हे उद्योगजगतात अग्रस्थानी असले, तरी त्यांचे वैयक्तिक जीवन प्रचंड विवादास्पद राहिले आहे. आता त्यांच्या मुलीने उघडपणे “मला माझ्या कुटुंबाबद्दल काहीही माहिती नाही” असे सांगितल्याने हा वाद आणखी गडद झाला आहे. त्यांच्या मुलीच्या विधानांमुळे मस्कच्या कुटुंबातील अंतर्गत कलह जगासमोर आला आहे. त्यांचे इतर मुलगे आणि मुली त्यांच्याशी कोणत्या प्रकारचे नाते ठेवतात, हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.