Nimisha Priya : निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशीची शिक्षा रद्द झाली का? सरकारने सांगितले सत्य
येमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय न्रस निमिषा प्रिया हिला न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या निर्णयानंतर निमिषा हिला 16 जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती.
येमेनमध्ये भारतीय नागरिक निमिषा प्रियाची फाशी रद्द?
फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे वृत्त खोटे
चुकीच्या माहितीपासून मंत्रालयाने जनतेला, माध्यमांना दूर राहण्याचे आवाहन
Nimisha Priya News in Marathi : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची येमेनमध्ये फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या बातमीने तिच्या कुटुंबाला आणि प्रियजनांना मोठा दिलासा मिळाला आहे. निमिषाला या महिन्याच्या १६ तारखेला सनाच्या तुरुंगात फाशी देण्यात येणार होती, परंतु भारत सरकार, धार्मिक नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे ही शिक्षा तात्पुरती पुढे ढकलण्यात आली. आता अखेर निमिषाला नवीन जीवन मिळाले आहे. याचसंदर्भात आता परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली की येमेनमध्ये भारतीय नागरिक निमिषा प्रियाची फाशी पुढे ढकलण्यात आली आहे. फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द करण्यात आल्याचे वृत्त खोटे असल्याचेही स्पष्ट केले.
या प्रकरणात प्रसारित होणाऱ्या अपुष्ट वृत्तांपासून आणि चुकीच्या माहितीपासून मंत्रालयाने जनतेला आणि माध्यमांना दूर राहण्याचे आवाहन केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, सरकार प्रिया आणि तिच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करत आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि मैत्रीपूर्ण सरकारांशी जवळून काम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, “ही एक संवेदनशील बाब आहे. भारत सरकार या प्रकरणात सर्वतोपरी मदत करत आहे. आमच्या एकत्रित प्रयत्नांमुळे, शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाचे बारकाईने निरीक्षण करत आहोत आणि सर्वतोपरी मदत करत आहोत.”
सरकारचे स्पष्टीकरण
यापूर्वी, १६ जुलै रोजी होणारी फाशी भारत सरकारच्या नेतृत्वाखालील राजनैतिक हस्तक्षेप आणि वाटाघाटींनंतर पुढे ढकलण्यात आली होती. जयस्वाल यांनी स्पष्ट केले की त्यांची फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्द केल्याचा दावा करणारे वृत्त खोटे आहे. ते म्हणाले, “आम्ही या मुद्द्यावर काही मित्र देशांच्या सरकारांशीही संपर्कात आहोत… काही घडामोडी झाल्याचा दावा करणारे वृत्त चुकीचे आहे. कृपया आमच्याकडून अपडेट्सची वाट पहा. आम्ही सर्व पक्षांना चुकीच्या माहितीपासून दूर राहण्याचे आवाहन करतो.” निमिषा व्यावसायिक भागीदाराच्या हत्येचा दोषी आहे.
केरळमधील ३७ वर्षीय परिचारिका निमिषा प्रिया हिला २०१७ मध्ये तिचा व्यावसायिक भागीदार तलाल अब्दो महदी हिच्या हत्येबद्दल दोषी ठरवण्यात आले होते. तिला २०२० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि नोव्हेंबर २०२३ मध्ये येमेनच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेने हा निकाल कायम ठेवला होता. यापूर्वी, १७ जुलै रोजी जयस्वाल यांनी असेही सांगितले होते की भारत सरकारने प्रियाच्या कुटुंबाला येमेनच्या शरिया कायद्याअंतर्गत जटिल कायदेशीर प्रक्रियेत मदत करण्यासाठी वकील नियुक्त केला आहे. सरकारने नियमित कॉन्सुलर भेटींची व्यवस्था केली आहे आणि अनुकूल तोडगा काढण्यासाठी स्थानिक अधिकारी आणि इतर देशांशी चर्चा सुरू ठेवली आहे. ते म्हणाले, “भारत सरकार सर्व शक्य कायदेशीर आणि कॉन्सुलर सहाय्य प्रदान करत आहे, ज्यामध्ये कुटुंबाला दुसऱ्या पक्षासोबत परस्पर सहमतीने तोडगा काढण्यासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी प्रयत्न करणे समाविष्ट आहे.”