रशियन सैन्यात झपाट्याने वाढतोय HIV Aids चा संसर्ग; अहवालांतून धक्कादायक कारणे उघड
Russia Army Aids Case: जगात सर्वाधिक एचआयव्ही संसर्ग असलेल्या देशांमध्ये रशियाचा समावेश आहे. आता युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती आणखी भयानक झाली आहे. अहवालांनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैनिकांमध्ये एचआयव्ही संसर्गाचे प्रमाण २० ते ४० पट वाढले आहे.
रशियात एचआयव्हीचा संसर्ग वाढण्याची अनेक संभाव्य कारणेही समोर आली आहेत. यातील सर्वात पहिले म्हणजे, युद्धाची तणावपूर्ण परिस्थिती. रशिया युक्रेन युद्धामुळे हजारो रशियन सैनिक सध्या तणावाखाली जगत आहेत. युद्धामुळे आज आहोत तर उद्या नाही, अशी या सैनिकांची मनस्थिती झाली आहे. याच तणावातून ते असुरक्षित लैंगिक संबंध आणि अंमली पदार्थांच्या व्यसनाधिन होऊ लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, काही सैनिक अंमली पदार्थांच्या वापरासाठी एकाच सिरींजचा वापर करत असल्याचे अहवालातून उघड झाले आहे. ज्यामुळे संसर्गाचा धोका अनेक पटींनी वाढला आहे.
युद्धक्षेत्रात आरोग्य साधनांचा अभाव आणि निष्काळजीपणा
युक्रेन सीमेवर असलेल्या रशियन लष्करी तळांमध्ये आरोग्य सेवांची तीव्र कमतरता आहे. कंडोमसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव, कोणत्याही सुरक्षा उपायांशिवाय फील्ड हॉस्पिटलमध्ये संक्रमित सैनिकांवर उपचार आणि नसबंदीचा अभाव यामुळे एचआयव्ही संसर्ग वेगाने पसरू लागला आहे.
एका वृत्त वाहिनीच्या अहवालानुसार, अनेक संक्रमित सैनिकांना आपत्कालीन परिस्थितीत उपचारांसाठी दाखल केले जाते, परंतु वेळ आणि संसाधनांच्या कमतरतेमुळे तेथे खबरदारी घेतली जात नाही. यामुळे संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. या युद्धामुळे रशियात आरोग्यसेवेत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.
याशिवाय अहवालांमध्ये आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. रशिया थेट तुरुंगांमधून सैनिकांची भरती करत आहे, ज्यामध्ये अनेक एचआयव्ही पॉझिटिव्ह कैदी देखील आहेत. सैन्यबळ वाढवण्यासाठी रशियन सरकारकडून हे पाऊल उचलले गेले असले तरी त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात. युक्रेनियन अधिकाऱ्यांच्या मते, रशियन सैन्यात भरती होणाऱ्या नवीन सैनिकांपैकी किमान २०% एचआयव्ही पॉझिटिव्ह आहेत. त्याचा प्रभाव केवळ लष्करी क्षेत्रापुरता मर्यादित नसून त्याचा संपूर्ण आरोग्यसेवा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. युद्धकाळातील रणनीती आणि मानवी हक्कांमधील हा एक नवीन संघर्ष असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
काही रशियन सैनिकांनी खुलासा केला आहे की एचआयव्ही संसर्ग असूनही त्यांना युद्धात उतरण्यासाठी अँटी-व्हायरल औषधे दिली जातात. ही औषधे रोग बरा करत नाहीत, परंतु विषाणूचा प्रभाव कमी करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. यामुळे इतर आजारांची लागण होण्याची शक्यता कमी होते. पण तरीही, युद्धक्षेत्रात या औषधांचा पुरवठा सातत्याने होत राहणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. मर्यादित संसाधने आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे हे प्रयत्न अपूर्ण असल्याचेही रशियन सैनिकांचे म्हणणे आहे.