North Korea fired ballistic missiles off South Korea's coast in response to U.S.-South Korea drills
सोल/प्योंगयांग – उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या किनारी भागात अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागून पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन केले आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव सुरू केला असताना उत्तर कोरियाने हे आक्रमक पाऊल उचलले. उत्तर कोरियाने याला अमेरिकेच्या आक्रमक धोरणाला दिलेले प्रत्युत्तर म्हटले असून, अमेरिकेच्या हालचालींमुळे कोरियन द्वीपकल्पात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असल्याचा दावा केला आहे.
क्षेपणास्त्र प्रक्षेपणामुळे तणाव वाढला
दक्षिण कोरियाच्या चीफ ऑफ स्टाफनुसार, सोमवारी उत्तर कोरियाच्या सैन्याने ह्वांघाई प्रांतातून अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली. काही वेळातच सलग क्षेपणास्त्र मारा करण्यात आला. या घटनेनंतर दक्षिण कोरियाचे सैन्य आणि अमेरिका परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. तणाव वाढू नये म्हणून दोन्ही देशांनी अधिक सतर्कता बाळगण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China-Taiwan Conflict : युद्धाचा धोका वाढतोय? तैवानविरोधी ड्रॅगनच्या नव्या खेळीने आशियात खळबळ
किम जोंग उन यांचा अमेरिकेला इशारा
अमेरिका आणि दक्षिण कोरिया कोरियन सीमेवर ११ दिवसांचा संयुक्त लष्करी सराव करत आहेत. यामुळे उत्तर कोरियाच्या हुकूमशहा किम जोंग उन यांना त्यांच्या सुरक्षेचा धोका वाटत आहे. उत्तर कोरियाने या सरावाला “युद्धास निमंत्रण देणारी कृती” असे म्हटले आहे. किम जोंग उन यांच्या बहिणीने तीन दिवसांपूर्वी अमेरिकेला थेट इशारा देत सांगितले होते. “तुम्ही तुमचा लष्करी सराव दुसरीकडे करा, अन्यथा आम्ही शांत बसणार नाही!” या इशाऱ्यानंतर अल्पावधीतच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागून आपली धमकी प्रत्यक्षात उतरवली.
ट्रम्प किम जोंग उन यांना घाबरवण्याच्या प्रयत्नात?
उत्तर कोरियाने अमेरिकेवर आरोप करत म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प प्रशासन किम जोंग उन यांना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. २०१८-२०१९ दरम्यान ट्रम्प आणि किम जोंग उन यांच्यात संवादाची प्रक्रिया सुरू झाली होती, मात्र काही महिन्यांतच दोन्ही देशांतील तणाव पुन्हा वाढला. उत्तर कोरियाने १५ दिवसांपूर्वीच अमेरिकेला थेट धमकी दिली होती. “जर आमच्या सीमेवर लष्करी सराव झाला, तर आम्ही शांत बसणार नाही,” असे उत्तर कोरियाने जाहीरपणे सांगितले होते.
उत्तर कोरियाच्या कृतीमुळे युद्धसदृश परिस्थिती?
उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागण्यापूर्वी एक निवेदन प्रसिद्ध केले होते. “कोरियन द्वीपकल्पात सर्व काही सुरळीत सुरू होते, मात्र अमेरिकेच्या आक्रमक हालचालींमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे उत्तर कोरियाने म्हटले आहे. १९५३ मध्ये कोरियन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी युद्धविराम करण्यात आला होता. मात्र, उत्तर कोरियाच्या मते अमेरिकेच्या चिथावणीखोर हालचालींमुळे हा युद्धविराम कधीही मोडू शकतो. युद्ध टाळायचे असेल, तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाने तातडीने आपले लष्करी सराव थांबवावेत, अशी उत्तर कोरियाची मागणी आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ना घर ना घाट का…’ दिवाळखोर ललित मोदीला वानुअतू सरकारचा मोठा झटका
आंतरराष्ट्रीय तणाव वाढण्याची शक्यता
संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. उत्तर कोरियाने सतत क्षेपणास्त्र चाचण्या सुरू ठेवल्यास कोरियन द्वीपकल्पातील शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिका आणि दक्षिण कोरिया लष्करी सराव थांबवण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांत हा तणाव अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.