युद्धाचा धोका वाढतोय? तैवानविरोधी ड्रॅगनच्या नव्या खेळीने आशियात खळबळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बीजिंग – तैवानप्रश्नी चीनने आपल्या आक्रमक धोरणाला अधिक धार दिली असून, जपानच्या हस्तक्षेपाविरोधात थेट इशारा दिला आहे. चीनची वाढती आक्रमकता आणि जपानचे अमेरिकेसोबतचे मजबूत संरक्षण संबंध यामुळे आशियामध्ये तणाव वाढला आहे. अलीकडे जपानच्या तैवानमधील सक्रियतेमुळे चीनच्या भूमिकेत अधिक तीव्रता आली आहे. चीनचे वरिष्ठ मुत्सद्दी वांग यी यांनी जपानला स्पष्ट शब्दांत चेतावणी दिली आहे की, तैवानच्या प्रश्नात हस्तक्षेप करणे म्हणजे जपानसाठी स्वतःच्या अडचणी वाढवण्यासारखे असेल. चीनच्या या आक्रमक भूमिकेमुळे जपान-चीन संबंध आणखी बिघडण्याची चिन्हे आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : सीरियात रक्तरंजित तांडव; एक हजाराहून अधिक मृत्यू, महिलांची नग्न परेड आणि हिंसाचाराने हैराण देश
चीन तैवानला स्वतःचा भाग मानतो आणि त्याच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी कटिबद्ध आहे. चीनच्या मते, तैवानच्या स्वातंत्र्याची कोणतीही चळवळ त्यांच्या सार्वभौमत्वाविरोधात आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत स्वीकारली जाणार नाही. वांग यांनी यावर भाष्य करताना सांगितले की, “तैवानच्या नावाने संकट निर्माण करणे म्हणजे जपानला स्वतःसाठी संकट ओढवून घेण्यासारखे आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, तैवानवर नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया अपरिहार्य आहे आणि यातील कोणताही हस्तक्षेप पराभवाला सामोरे जाईल. तैवानप्रश्नी जपानच्या भूमिकेवर टीका करताना वांग यांनी “जपानमधील काही पश्चात्ताप न करणाऱ्या व्यक्तींवर” जोरदार निशाणा साधला, जे अद्याप तैवानच्या स्वातंत्र्यास पाठिंबा देत आहेत.
चीनकडे जगातील सर्वात मोठे सैन्य असून, त्याच्या सक्रिय सैनिकांची संख्या अंदाजे २० लाख आहे, तर जपानमध्ये ही संख्या फक्त अडीच लाख आहे. चीनकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रसुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. J-20 आणि J-35 सारखी स्टेल्थ फायटर विमाने, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्र यामध्ये चीन मोठी प्रगती करत आहे. तर, जपानकडे एकूण १५०० विमाने असून त्यात २०० हून अधिक लढाऊ विमाने आहेत. चीनच्या तुलनेत जपानच्या हवाई दलाची ताकद कमी असली तरी त्याचे सैन्य तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्याधुनिक आहे. अमेरिकेसोबत संरक्षण भागीदारीमुळे जपानकडे उच्च प्रशिक्षित सैन्य आणि अत्याधुनिक विनाशिका तसेच पाणबुड्या आहेत.
चीन आणि जपानचे संबंध ऐतिहासिकदृष्ट्या चढ-उतारांनी भरलेले आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी काही महिन्यांपूर्वी परस्पर संबंध सुधारण्याचे संकेत दिले होते. मात्र, तैवान मुद्द्यावर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावर भाष्य करताना सांगितले की, “तैवानमधील हस्तक्षेप जपानसाठी धोकादायक ठरू शकतो.” वांग यांनी जपानला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तैवानप्रश्नी कोणताही हस्तक्षेप हा धोकादायक ठरेल आणि जपानच्या सुरक्षेला धोका निर्माण करू शकतो.”
चीनने तैवानवरील ताबा मिळवण्यासाठी मोठा मास्टरप्लान आखला असून, जपानच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. जर हा संघर्ष युद्धात बदलला, तर जपान-अमेरिका आघाडी विरुद्ध चीन असा संघर्ष घडण्याची शक्यता आहे.विशेषतः तैवानच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने जपानला साथ दिल्यास आशिया-पॅसिफिक प्रदेशातील सामरिक संतुलन बदलू शकते. त्यामुळे या संघर्षाचे परिणाम केवळ चीन आणि जपानपुरते मर्यादित राहणार नाहीत, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय राजकारणावर त्याचा मोठा प्रभाव पडेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘ना घर ना घाट का…’ दिवाळखोर ललित मोदीला वानुअतू सरकारचा मोठा झटका
चीनने जपानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला असला, तरी जपान अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे आपल्या भूमिकेपासून मागे हटेल, असे दिसत नाही. त्यामुळे येत्या काळात तैवानच्या मुद्द्यावर चीन आणि जपान यांच्यातील संघर्ष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.