रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किंमतीत वाढ; अमेरिकेत तेलाच्या साठ्यावर प्रभाव
कीव: गेल्या दीड वर्षापासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या वापराच्या परवानगी नंतर रशियावर हल्ले करण्यात आले आहेत. तसेच ब्रिटीश क्रूझ क्षेपणास्त्रांचा हल्ला देखील करण्यात आला आहे. रशिया देखील युक्रेनवर हल्ले करण्याच्या तयारीत असून आता रशिया-युक्रेन युद्धाला नवे आक्रमक वळण मिळाले आहे. इन्व्हेस्टिंग डॉट कॉमच्या अहवालानुसार, रशिया-युक्रेन संघर्षामुळे वाढलेल्या तणावामुळे तेलाच्या किमतींमध्ये बुधवारी वाढ झाली, तरीही अमेरिकेतील तेल साठ्यांमध्ये मोठ्या वाढीमुळे ही वाढ मर्यादित राहिली आहे.
रशिया-युक्रेन संघर्षाचा प्रभाव
रशिया-युक्रेन युद्धाच्या वाढत्या तणावामुळे तेल पुरवठ्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. युक्रेनने अमेरिकेकडून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर सुरू केल्यानंतर रशियाने अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. युक्रेनमधील अमेरिकन दूतावास बंद करण्यात आले आहे. या मोठ्या हवाई हल्ल्याचा धोका दूतावासाल असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. या घटनेमुळे पश्चिम देशांवर या युद्धात आणखी गुंतण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, इराण 60% शुद्धीकरण असलेल्या युरेनियमच्या साठ्यांवर मर्यादा आणण्याची शक्यता आहे. यामुळे इराणी तेल पुरवठ्याचा धोका कमी होऊ शकतो, असे ING या वित्तीय संस्थेने नमूद केले आहे.
अमेरिकेतील तेल साठे
अमेरिकन पेट्रोलियम संस्थेच्या (API) आकडेवारीनुसार, 15 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तेल साठ्यांमध्ये 4.75 दशलक्ष बॅरल्सची वाढ झाली आहे. ही वाढ अपेक्षित 0.8 दशलक्ष बॅरल्सच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आहे. ही वाढ पुढील सरकारी अहवालांमध्येही दिसण्याची शक्यता आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तेल पुरवठा जास्त होण्याची चिंता वाढली आहे.
फोटो सौजन्य: सोशल मीडिया
तेल बाजारातील अनिश्चितता
UBS या स्विस बँकेच्या अधिकाऱ्यांच्या मते, तेल बाजारावर अमेरिकेतील वाढत्या पुरवठ्याचा आणि मागणीवरील परिणामांमुळे अनिश्चितता आहे. याशिवाय, OPEC+ देशांच्या उत्पादन कपातीमुळे ब्रेंट क्रूड पुढील काही काळ $70-75 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये जागतिक GDP वाढ कमी झाल्याने आणि तेलाच्या किमती वाढल्याने मागणी कमी होण्याची शक्यता आहे, परंतु 2020 च्या उत्तरार्धापर्यंत तेल मागणी वाढत राहील, असे UBS ने म्हटले आहे.
रशिया-युक्रेन संघर्ष आणि इराणसंबंधित पुरवठा धोक्यामुळे तेल बाजारावर ताण आला आहे. तर अमेरिकेतील वाढते साठे किमतींवर नियंत्रण ठेवत आहेत. 2025 पर्यंत पुरवठ्याचा भरपूर साठा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय याचा परिणाम भारतावर होण्याची देखील शक्यता आहे. कारण भारत या देशांतून जवळपास 80% पेक्षा जास्त तेल आयात करतो. मात्र आता तेल पुरवठा बंद होऊ शकतो. रशिया-युक्रेन युद्धामुळे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये कच्चा तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.