पाकिस्तानचे अफगानिस्तानात तीव्र हवाई हल्ला; तालिबानच्या ठिकाणांना लक्ष्य, दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा
काबूल: एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने अफगानिस्तानमध्ये मंगळवारी (24 डिसेंबर 2024) रात्री उशिरा हवाई हल्ले करून पाकिस्तानी तालिबानच्या संशयित तळांना लक्ष्य केले. हे हल्ले अफगाणिस्तानच्या पकटिका प्रांतातील डोंगराळ भागांवर करण्यात आले आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 15 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. यावर अफगानिस्तानने तीव्र प्रतिक्रीया देत लवकरच हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल असे म्हटले आहे.
तालिबानच्या तळांना लक्ष्य
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, या हल्ल्यांत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या हल्ल्यांत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी)च्या प्रशिक्षण केंद्रांचा विध्वंस करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात कुटपर्यंत हे हल्ले केले याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. यापूर्वीही पाकिस्तानने मार्च महिन्यात अशाच प्रकारचे हल्ले केले होते.
अफगाणिस्तानचा आक्षेप- प्रत्युत्तर देण्याची धमकी
पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यानंतर अफगानिस्तान तीव्र आक्षेप व्यक्त केला आहे. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्याचा तीव्र निषेध करत चोख प्रत्युत्तर मिळेल असे म्हटले आहे. काबुल प्रशासनाने म्हटले आहे की, या हल्ल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांसह सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. त्यांनी हा हल्ला आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पाकिस्तान लवकरच याचे परिणाम भोगावे लागतील असे अफगानिस्तानने म्हटले आहे.
हल्ल्याचे नक्कीच उत्तर देऊ- अफगाणिस्तान
अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, असे एकतर्फी उपाय कोणत्याही समस्येचे समाधान करू शकत नाहीत. अफगाणिस्तानने या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आपल्या मातृभूमीचे संरक्षण करणे हा आमचा अधिकार आहे, आणि आम्ही या हल्ल्याला नक्कीच उत्तर देऊ.”
तालिबानच्या वाढत्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचा त्रास
पाकिस्तानने आरोप करत म्हटले आहे की, पाकिस्तानी तालिबान अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून पाकिस्तानवर दहशतवादी हल्ले करत आहे. मात्र, अफगाणिस्तानने हे आरोप नाकारले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हस्तगत केल्यानंतर टीटीपी अधिक सक्रिय आणि शक्तिशाली झाला.
तालिबानने नोव्हेंबर 2022 मध्ये पाकिस्तानसोबतची शस्त्रसंधी एकतर्फीपणे संपुष्टात आणली होती. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानवर हल्ले वाढवण्यात आले. गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने पाकिस्तानच्या अनेक सैनिकांना आणि पोलिसांना ठार केले आहे. यामुळे पाकिस्तानने अफगाणिस्तानातील तालिबानच्या तळांवर हल्ला करण्याचे धोरण स्वीकारले आहे.