
Balochistan FC shelling Mastung Pakistan Army civilian deaths Balochistan
पाकिस्तानी लष्कराकडून बलुचिस्तानमधील स्थानिक बलुच (Balochistan) नागरिकांवर होणारे अत्याचार आणि मानवाधिकार उल्लंघन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. बलुचिस्तानच्या मस्तंग जिल्ह्यातील करदिगाप तहसीलमध्ये पाकिस्तानच्या ‘फ्रंटियर कॉर्प्स’ (FC) या निमलष्करी दलाने निवासी भागांना लक्ष्य करत बेछूट तोफगोळ्यांचा मारा केला. या अंधाधुंद आणि क्रूर हल्ल्यात चार निष्पाप नागरिकांचा नाहक बळी गेला असून, यामध्ये चिमुकल्या बालकांचा आणि एका महिलेचा समावेश आहे.
स्थानीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास फ्रंटियर कॉर्प्सच्या सैनिकांनी अचानक करदिगापमधील गुर्गिना आणि किल्ली पसंद खान या रहिवासी भागांवर तोफगोळ्यांचा वर्षाव सुरू केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड घबराट पसरली आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. मात्र, लष्कराने निवासी घरांवर थेट डागलेले तोफगोळे थेट स्थानिक नागरिक अब्दुल जलील सरपारा यांच्या घरावर जाऊन आदळले.
अब्दुल जलील सरपारा यांच्या घरावर झालेल्या या भीषण हल्ल्यात त्यांच्या वृद्ध आई आणि दोन लहान मुलींचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर घरातील इतर अनेक जण गंभीर जखमी झाले. या घटनेत ६ वर्षांची एक अत्यंत लहान मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने क्वेट्टा येथील प्रांतीय रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यामुळे या हल्ल्यातील एकूण मृतकांची संख्या चारवर पोहोचली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump911Claim : ‘दोन अग्निशामकांनी मला उचलून…’ 9/11 बाबत ट्रम्प यांनी मारल्या थापा; अमेरिकन मीडियाने केला ‘असा’ पर्दाफाश
पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार केल्या जाणाऱ्या अशा शेलिंग आणि ड्रोन हल्ल्यांमुळे बलुचिस्तानमधील सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मस्तंगच्या खाडकोचा भागात पाकिस्तानी दलाच्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह तीन जण गंभीर जखमी झाले होते. याशिवाय ऑगस्ट महिन्यात घडलेल्या एका घटनेत चार बागायतदार मजुरांचा अशाच हल्ल्यात मृत्यू झाला होता.
पाकिस्तानी लष्कराच्या या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण मस्तंग आणि आसपासच्या भागात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी, मानवाधिकार कार्यकर्त्यांनी आणि पीडित कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून तीव्र निदर्शने सुरू केली. आंदोलकांनी क्वेट्टा-नुष्की महामार्ग (N-40) पूर्णपणे रोखून धरला असून वाहतूक ठप्प केली आहे.
प्रदर्शनकर्त्यांची मागणी आहे की, निष्पाप बालकांवर आणि महिलांवर तोफगोळे डागणाऱ्या दोषी लष्करी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणाद्वारे कारवाई करण्यात यावी. बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या लष्करी मोहिमांच्या नावाखाली होणारे हे ‘बलुच नरसंहार’ त्वरित थांबवण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterm Elections 2026: ट्रम्प यांची मोठी घोषणा; रिपब्लिकन जिंकल्यास प्रत्येक अमेरिकनाला मिळणार 5,000 डॉलर्स
बलुचिस्तानमध्ये गेल्या काही काळापासून पाकिस्तानी सैन्याकडून ‘सर्च ऑपरेशन’ आणि ‘सिक्युरिटी मेझर्स’च्या नावाखाली स्थानिक बलुच नागरिकांना जबरदस्तीने बेपत्ता (Enforced Disappearances) केले जात असल्याचा गंभीर आरोप मानवाधिकार संघटना करत आहेत. ‘बलुच व्हॉइस फॉर जस्टिस’ (BVJ) या मानवाधिकार संघटनेने चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, सुशिक्षित तरुणांना आणि नागरिकांना घरातून किंवा शिक्षणाच्या ठिकाणांवरून पळवून नेऊन अज्ञात स्थळी डांबले जाते आणि नंतर बनावट चकमकीत (Staged Encounters) त्यांची हत्या करून मृतदेह फेकून दिले जातात.
मस्तंगमध्ये लष्करी प्रशासनाकडून अद्याप या तोफगोळ्यांच्या माऱ्याबाबत किंवा झालेल्या नागरी मृत्यूंबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्रसंघाने या अमानुष घटनेची तात्काळ दखल घेऊन पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात चौकशी करावी, अशी मागणी आता संपूर्ण जगभरातून जोर धरत आहे.