Pakistan’s Defense Minister Khawaja Asif said Saudi Arabia won’t get nuclear weapons under the deal
किस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केले की सौदी अरेबियाला अणु कवच मिळणार नाही, हा करार केवळ सुरक्षेसंदर्भात आहे.
रियाधमध्ये पाकिस्तान-सौदी संरक्षण करार झाला असून, हल्ला झाल्यास दोन्ही देश संयुक्त प्रतिसाद देतील.
अणुशस्त्रांचा वापर फक्त पाकिस्तानच्या सार्वभौम सुरक्षेसाठीच असल्याचे पाकिस्तानने ठामपणे जाहीर केले.
Pakistan Saudi deal : रियाधमध्ये नुकताच झालेला पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संरक्षण करार गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या करारानंतर अशी चर्चा सुरू झाली होती की पाकिस्तान आपल्या अणुशक्तीचा कवच सौदी अरेबियाला देईल का? पण पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्वतःच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की “सौदी अरेबियाला अणु कवच मिळणार नाही. हा करार केवळ संरक्षण आणि सुरक्षेसंदर्भात आहे. पाकिस्तान कोणत्याही परदेशी राष्ट्राला अण्वस्त्र उपलब्ध करून देऊ शकत नाही.”
पाकिस्तान हा जगातील काही अण्वस्त्रधारी देशांपैकी एक आहे. त्याच्याकडे सध्या सुमारे १७० अण्वस्त्रे असल्याचे आंतरराष्ट्रीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. मात्र, ही शस्त्रे केवळ पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठीच आहेत. ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की अण्वस्त्रांचा विकास हा कोणावर आक्रमण करण्यासाठी नव्हे तर पाकिस्तानवर हल्ला होऊ नये म्हणून करण्यात आला आहे. ते म्हणाले “आम्ही आमच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी अण्वस्त्र विकसित केली आहेत. यांचा वापर केवळ आपल्या सुरक्षेसाठीच होईल. पाकिस्तान अणुशक्तीबाबत कोणत्याही परदेशी राष्ट्राशी करार करणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh News : मशिदीतून घोषणा आणि नंतर हल्ला… क्षणार्धात अनेक दर्गे जळून खाक, बांगलादेशात नक्की काय घडतंय?
गुरुवारी (१८ सप्टेंबर) रियाधमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि संरक्षण मंत्री खालिद बिन सलमान यांच्याशी महत्त्वपूर्ण करार केला.
या करारानुसार –
जर कोणत्याही देशावर हल्ला झाला तर तो हल्ला दोन्ही देशांविरुद्ध मानला जाईल.
बाह्य संकटांना दोन्ही राष्ट्रे एकत्रितपणे तोंड देतील.
सुरक्षेच्या क्षेत्रात संयुक्त सहकार्य वाढवले जाईल.
या घोषणेनंतर काही विश्लेषकांनी असा तर्क मांडला की पाकिस्तान सौदी अरेबियाला अणुशक्तीचे संरक्षण कवच देणार. मात्र ख्वाजा आसिफ यांच्या विधानानंतर ही चर्चा संपुष्टात आली आहे.
सध्या मध्यपूर्वेत फक्त इस्रायल हा अधिकृतपणे अणुशस्त्रधारी देश मानला जातो. SIPRI च्या अंदाजानुसार इस्रायलकडे ९० हून अधिक अण्वस्त्रे आहेत. मात्र इस्रायलने कधीही याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अशा परिस्थितीत सौदी अरेबिया आणि पाकिस्तानच्या करारामुळे या प्रदेशात अणुशक्तीबाबत मोठ्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
ख्वाजा आसिफ यांनी पुढे सांगितले की पाकिस्तानने हा कराराचा मसुदा सर्वांसोबत शेअर केला आहे. त्यांनी स्पष्ट केले – “आम्ही सौदी अरेबियाशिवाय इतर आखाती देशांशी देखील संवाद साधणार आहोत. जे मुस्लिम देश संयुक्तपणे आमच्यासोबत येऊ इच्छितील, त्यांना आम्ही सामावून घेऊ. आमचा प्रयत्न सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकत्र आणण्याचा आहे.”
पाकिस्तान आणि सौदी अरेबियातील या नव्या समीकरणामुळे इराणबाबत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. सौदी अरेबिया आणि इराणमधील पडद्यामागील संघर्ष सर्वपरिचित आहे. पाकिस्तान हा इराणचा शेजारी देश असल्याने या करारामुळे नवे तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आत्तापर्यंत इराणने या करारावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh News : मशिदीतून घोषणा आणि नंतर हल्ला… क्षणार्धात अनेक दर्गे जळून खाक, बांगलादेशात नक्की काय घडतंय?
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री तरार यांनीही या कराराचे महत्त्व स्पष्ट केले आहे. त्यांच्या मते, हा करार दोन पवित्र मशिदींच्या संरक्षणासाठी करण्यात आला आहे. तरार म्हणालेa “इस्रायल सातत्याने आखाती देशांना लक्ष्य करत आहे. अशा परिस्थितीत सौदी अरेबियाही धोक्यात होता. या करारामुळे ती शक्यता दूर झालीa आहे.”
या संपूर्ण घडामोडींकडे केवळ पाकिस्तान-सौदी अरेबियाच्या नातेसंबंधाच्या दृष्टीने न पाहता, मध्यपूर्वेतील बदलत्या समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. पाकिस्तानने अण्वस्त्र केवळ स्वतःच्या संरक्षणासाठीच आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित करून जगाला संदेश दिला आहे की तो अणुशक्तीचा जबाबदार वापर करणारा देश आहे.