Pakistan's illegal PoK hold Govt's covert interference
Pakistan illegal occupation PoK : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे. या घटनेनंतर देशभरात पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पुन्हा भारतात विलीन करण्याची मागणी अधिकच तीव्र झाली आहे. लाखो भारतीयांनी सोशल मीडियावर, सभांत आणि राजकीय व्यासपीठांवर ही मागणी उचलून धरली आहे. मात्र या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो – पीओके पाकिस्तानचा अधिकृत भाग आहे का?
पाकिस्तानने 1947 साली काश्मीरवर आक्रमण करून या भागाचा ताबा घेतला. तो दिवस आजही भारतासाठी एका अर्धवट लढाईचे प्रतीक ठरतो आहे. गेल्या सात दशकांहून अधिक काळ पीओकेवर पाकिस्तानचा ताबा असला, तरी तो पाकिस्तानच्या संविधानात अधिकृतपणे सामावलेला नाही. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेंब्लीमध्ये पीओकेचे कोणतेही प्रतिनिधित्व नाही, आणि अधिकृत नकाशांतही या भागाचा स्वतंत्र उल्लेख असतो.
पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओके सुमारे 13,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा भूभाग असून, येथे सुमारे 40 लाख लोक राहत आहेत. पाकिस्तानने या भागाला तथाकथित “स्वायत्तता” दिल्याचा दावा केला आहे. परंतु, हा दावा वरवरचा असून, प्रत्यक्षात पाकिस्तानचा हस्तक्षेप स्पष्ट दिसतो.
पीओकेमध्ये स्वतंत्र विधानसभा, पंतप्रधान, राष्ट्रपती, पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्था असून सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय सारख्या संस्था कार्यरत आहेत. सध्या येथे चौधरी अन्वर-उल-हक यांचे सरकार कार्यरत आहे. पण या सत्ताधाऱ्यांच्या निवडीबाबतच पाकिस्तानवर नेहमी संशय घेतला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युद्ध न होता पराभव! पाकिस्तानच्या सैन्याला जबर धक्का; बलुच बंडखोरांकडून मंगोचरवर ताबा
पाकिस्तान सरकारवर अनेकदा असा आरोप झाला आहे की पीओकेतील निवडणुकीत फक्त त्यांचे समर्थकच निवडणूक लढवू शकतात. विरोधी उमेदवारांना रोखणे, निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे आणि पाकिस्तान पुरस्कृत नेत्यांनाच सत्तेवर बसवणे हे सर्रास प्रकार येथे घडतात. त्यामुळे लोकशाही प्रक्रिया केवळ नावापुरती उरते. तथापि, पाकिस्तान या भागात घडणाऱ्या घटनांबद्दल स्वायत्ततेचा मुखवटा घालून स्वतःचे हात झटकतो, पण प्रत्यक्षात निर्णयक्षमतेवर त्याचाच अघोषित ताबा आहे.
भारताने कधीही पीओकेचा पाकिस्तानचा भाग म्हणून स्वीकार केला नाही. सर्व भारतीय नकाशांमध्ये पीओकेचा समावेश जम्मू-काश्मीरच्या अविभाज्य भागातच केला जातो. भारताचे स्पष्ट मत आहे की पाकिस्तानने या भूभागावर बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे, आणि तो परत मिळवण्याचा भारताचा संकल्प कायम आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S-400 डेटा लीकचा संभाव्य धोका; पाकिस्तान-चीन गुप्त करारामुळे भारताची चिंता वाढली
पीओकेबाबत पाकिस्तानची भूमिका ही फसवणुकीची आहे. संविधानात सामाविष्ट न करता, निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करून, आणि स्वायत्ततेच्या नावाखाली राजकीय नियंत्रण राखण्याचा पाकिस्तानचा डाव सातत्याने स्पष्ट होत आहे. भारतासाठी पीओके ही केवळ भूप्रदेशाची नव्हे, तर राष्ट्रीय अस्मितेची आणि ऐतिहासिक सत्याची बाब आहे. त्यामुळे, भारतातील लोक पीओके परत मिळवण्याच्या मागणीला केवळ राजकीय मुद्दा न मानता, ती एक राष्ट्रीय गरज मानतात – आणि त्यावर कोणताही तडजोड स्वीकारण्याच्या मनःस्थितीत नाहीत. आज जेव्हा सीमेवर तणाव वाढतो आहे, तेव्हा हा विषय पुन्हा एकदा देशाच्या केंद्रस्थानी आला आहे – आणि यावेळी देश अधिक सजग, अधिक दृढनिश्चयी दिसतो आहे.