peru 2300 year old ancient tomb unique archaeological discovery
Peru 2300-year-old tomb : पेरूच्या वायव्य किनाऱ्यावरील पुएमापे (Puemape) मंदिर संकुलात पुरातत्वशास्त्रज्ञांनी नुकताच एक विलक्षण आणि भयचकित करणारा शोध लावला आहे. या मंदिराच्या उत्खननादरम्यान त्यांना तब्बल २३०० वर्षांपूर्वीची कबरींची शृंखला सापडली. मात्र या कबरीतील सांगाडे सामान्य नव्हते त्यांचे हात पाठीमागे घट्ट बांधलेले होते, तर गळ्यात दोरी लटकत होती. इतकेच नव्हे तर मृतांचे चेहरे जमिनीकडे होते, जी दफनविधीची अँडियन परंपरेत फारच असामान्य पद्धत मानली जाते.
सॅन मार्कोसच्या राष्ट्रीय विद्यापीठातील प्राध्यापक आणि या उत्खननाचे प्रमुख हेन्री टँटालियन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कबरींमध्ये तब्बल डझनभर अवशेष सापडले आहेत. काहींच्या कवटीत गंभीर फटके किंवा फ्रॅक्चर आढळले आहेत. त्यातून असा निष्कर्ष निघतो की या व्यक्तींना केवळ मृत्यूच नाही, तर कदाचित मानवी बलिदान देण्यात आले असावे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, दफन करताना मृतांसोबत कोणतीही भेटवस्तू, अलंकार किंवा वस्तू ठेवण्यात आल्या नाहीत, जे त्या काळच्या अंत्यसंस्कारात विरळच घडत असे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनच्या लष्करी परेडला अनुपस्थित राहण्यामागे PM मोदींची राजकीय खेळी; भारताच्या परराष्ट्र धोरणात लपला होता ‘हा’ मोठा संदेश
पुएमापे हे मंदिर सुमारे ३००० वर्षे जुने असल्याचे संशोधकांचे मत आहे. मात्र येथे सापडलेल्या कबरी या नंतरच्या काळातील म्हणजेच अंदाजे ४०० ते २०० इ.स.पूर्व या कालखंडातील आहेत. संशोधकांच्या मते, या मंदिराचा नियमित धार्मिक उपयोग थांबल्यानंतर मानवी बलिदानाची प्रथा येथे सुरू झाली असावी. त्यामुळे हा शोध केवळ इतिहास नाही तर त्या काळातील धार्मिक व सामाजिक परंपरांवर नवा प्रकाश टाकतो.
या विचित्र शोधामुळे पेरूमधील स्थानिक लोकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या मते, या सांगाड्यांना छेडल्याने काहीतरी अनुचित घडू शकते. काही जणांनी शास्त्रज्ञांना अशी कबर उघडण्यापासून परावृत्त करावे, असेही मत व्यक्त केले. स्थानिक समाजाच्या श्रद्धा, भीती आणि वैज्ञानिक शोध यामध्ये संघर्ष दिसून येतो.
हेन्री टँटालियन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांची टीम सध्या सापडलेल्या सांगाड्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करत आहे. डीएनए चाचण्या घेऊन मृतांची खरी ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ते स्थानिक समाजातील लोक होते की शेजारच्या दरीतील हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्याचबरोबर मंदिर परिसरात सापडलेल्या मातीच्या भांड्यांचे, प्राण्यांचे अवशेष आणि वनस्पतींचेही परीक्षण करण्यात येत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Power Of Siberia 2 : जागतिक ऊर्जा बाजारात नवी क्रांती; चीन-रशियाच्या ‘या’ ऐतिहासिक कराराने अमेरिकेला थेट आव्हान
२३०० वर्षांपूर्वीच्या या कबरींमधून मानवी इतिहासातील एक गडद आणि गूढ पान समोर आले आहे. मृतांची बांधलेली शरीरे, गळ्यातील दोरी, चेहरा जमिनीकडे या सर्व गोष्टी भूतकाळातील भीषण धार्मिक विधींची कहाणी सांगत आहेत. एकीकडे विज्ञान या गूढाचा शोध घेत आहे, तर दुसरीकडे स्थानिक समाजाच्या श्रद्धा त्याला वेगळी दिशा दाखवत आहेत. पेरूतील हा शोध केवळ पुरातत्वशास्त्रासाठीच नव्हे, तर मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीच्या अभ्यासासाठीही अमूल्य मानला जातो.