BRICS परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी रशियाला रवाना
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी रशियाच्या कझान शहरात होणाऱ्या 16 व्या BRICS शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान मोदींचा हा दोन दिवसांचा दौरा आहे. गेल्या ४ महिन्यांत पंतप्रधान मोदींचा हा दुसरा रशिया दौरा असून याआधी ते जुलैमध्ये भारत-रशिया शिखर परिषदेत सहभागी झाले होते. या दोन दिवसीय दौऱ्यात पंतप्रधान मोदी BRICS नेत्यांसोबत उपस्थित राहणार असून, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याही ते भेट घेणार आहेत. याशिवाय, पंतप्रधान मोदी दौऱ्यादरम्यान अनेक नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार आहेत.
2 वर्षांनी चीनसोबत द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता
या परिषदेत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या 16 व्या BRICS परिषदेत ‘समान जागतिक विकास आणि सुरक्षिततेसाठी बहुपक्षीयता मजबूत करणे, यावर भर दिला जाणार आहे. या विषयावरील ही शिखर परिषद प्रमुख जागतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी नेत्यांना एक महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देईल. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी BRICS च्या दोन सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.
हे देखील वाचा- भारत आणि चीन यांच्यातील वाद संपणार? LAC वर गस्त घालण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार
याशिवाय, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी दोन वर्षांनंतर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर ही चर्चा झाली, तर 2022 मध्ये बाली, इंडोनेशियात झालेल्या G20 परिषदेनंतर ही दोन्ही नेत्यांची पहिली भेट असेल. या परिषदेचा तपशील देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी म्हटले आहे की, संस्थापक सदस्यांसह नवीन सदस्यही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ही परिषद 22 ऑक्टोबरला सुरू होणार आहे.
#WATCH | Russia: Visuals from Kazan, ahead of the BRICS summit 2024
Prime Minister Narendra Modi will visit Russia from 22-23 October at the invitation of Russian President Vladimir Putin, to attend the 16th BRICS Summit, which is being held in Kazan, under the Chairmanship of… pic.twitter.com/fCKdFdT87B
— ANI (@ANI) October 21, 2024
सीमा विवाद सोडवण्यासाठी चीनसोबत होणार चर्चा
या परिषदेपूर्वी भारत आणि चीनमध्ये एक करार करण्यात आला आहे. या करारानुसार, 2020 पासून सुरू असलेला सीमावाद सोडवण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे. भारत आणि चीन यांच्यातील पूर्व लडाखमध्ये 52 महिन्यांपासून सुरू असलेला सीमा तणाव कणी झाला आहे. तसेच दोन्ही देशांमधील लष्करी आणि राजनयिक स्तरावरील सरावानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) गस्त आणि लष्करी तणाव कमी करण्यासाठीही करार करण्यात आला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी या निर्णयाची घोषमा करताना म्हटले आहे की, भारत 2020 मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर घडलेल्या घटनांपासून लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवर चिनी सतत संपर्कात आहे. यामुळे दोन्ही देशांमध्ये WMCC आणि लष्करी कमांडर स्तरावर अनेक चर्चा करण्यात आल्या आहेत.