फोटो सौजन्य: सोशल मीडिया
कीव: सध्या रशिया-युक्रेन युद्ध अधिक आक्रमक होत चालले आहे. हे युद्ध थांबण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने सलग दोन दिवस युक्रेनवर हल्ले केले आहेत. तसेच युक्रेनियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमुळे निवासी इमारतींचे नुकसान झाले. रशियाने केलेल्या या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामुळे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी संताप व्यक्त केला आहे.
ड्रोन नष्ट केले
रशिया सातत्याने कीववर हल्ले करत आहे. त्यामुळे युक्रेनची चिंता वाढली आहे. तसेच कीवचे लष्करी प्रशासन प्रमुख सेर्ही पोप्को यांनी टेलिग्राम मेसेजिंग ॲपवर सांगितले आहे की, रशियाने सुमारे 10 ड्रोनने शहरावर हल्ला केला होता मात्र युक्रेनने ते वेगवेगळ्या दिशांनी ते नष्ट केले होते. ते म्हणाले की कोणत्याही ड्रोनने आपल्या लक्ष्याला धडक दिली नाही. दरम्यान, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी देशाच्या पश्चिम भागात 100 हून अधिक युक्रेनियन ड्रोन पाडले. तसेच रशियाच्या सात भागांकडे पाठवलेले 110 ड्रोन काल रात्री पाडण्यात आले आहेत. मंत्रालयाने म्हटले की, अनेक ड्रोन कुर्क्सच्या रशियन सीमावर्ती भागाला लक्ष्य करत आहेत.
हे देखील वाचा- याह्या सिनवारच्या मृत्यूनंतर इस्रायलचा गाझामध्ये कहर; हमास लष्कराच्या निशाण्यावर
झेलेन्स्की रशियावर संतापले
रशियाच्या या हल्ल्यांमुळे युक्रेनचे अध्यक्ष वॉल्डेमिर झेलेन्स्की संतापले आहेत. त्यांनी म्हटले की, रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनवर सुमारे 800 हवाई बॉम्ब आणि 500 हून अधिक हल्ला ड्रोन सोडले आहेत. तसेच रशिया दररोज आमच्या शहरांवर आणि समुदायांवर हल्ला करत आहे, शत्रूने आपल्या लोकांविरुद्ध जाणूनबुजून केलेले हे दहशतवादाचे कृत्य असल्याचे म्हटेल आहेत. तसेच या हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका मदत करत आहे
तर, अमेरिकेने पुन्हा एकदा युक्रेनच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कीवला $425 दशलक्ष शस्त्रास्त्र पॅकेज मदत पाठवली आहे. पॅकेजमध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे यांचा समावेश आहे. बायडेन नोव्हेंबरमध्ये युक्रेनच्या मित्रपक्षांची आभासी बैठक देखील घेणार आहेत. या घटनांमुळे जागतिक पातळीवर चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान, रशियानेही अणुशक्तीचा पुन्हा एकदा उल्लेख करून पश्चिमेकडील देशांना युक्रेनला मदत करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाने आपल्या स्ट्रॅटेजिक न्यूक्लियर फोर्सेसच्या क्षेपणास्त्र युनिटच्या तयारीची चाचणी केली आहे.