PM Modi's Japan visit Over $40 billion investment new technologies and global message of Make in India
PM Modi In Japan : जपानमध्ये दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-जपान आर्थिक भागीदारीचा नवा इतिहास रचण्याचा संदेश दिला. टोकियोमध्ये शुक्रवारी (२९ ऑगस्ट) आयोजित इंडिया-जपान इकॉनॉमिक फोरममध्ये भाषण करताना त्यांनी सांगितले की, जपानी कंपन्यांनी आजवर भारतात ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. केवळ गेल्या दोन वर्षांतच तब्बल ३० अब्ज डॉलर्सची खाजगी गुंतवणूक झाली असून ही भागीदारी दोन्ही देशांसाठी अभूतपूर्व ठरत आहे. मोदी म्हणाले, “भारताच्या विकास प्रवासात जपान नेहमीच एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. मेट्रोपासून उत्पादन, सेमीकंडक्टरपासून स्टार्टअपपर्यंत प्रत्येक क्षेत्रात आमची भागीदारी परस्पर विश्वासाचे प्रतीक आहे.”
मोदी यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जपानी व्यावसायिक दिग्गजांशी केली. “मी आज सकाळी टोकियोला पोहोचलो. माझ्या दौऱ्याची सुरुवात व्यवसाय क्षेत्रातील मान्यवरांसोबत होत असल्याने मला विशेष आनंद आहे. अनेक जणांशी माझी ओळख गुजरातच्या दिवसांपासूनच आहे,” असे त्यांनी सांगितले. या वक्तव्यातून मोदी यांनी भारत-जपान नात्याचा केवळ राजकीयच नव्हे तर वैयक्तिक विश्वासाचा धागाही ठळक केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Kim Jong Un China visit : अमेरिकेने तयार राहावे! किम जोंग उन चीन दौऱ्यावर; पुतिनही राहणार उपस्थित
फोरममध्ये बोलताना मोदी यांनी मेक इन इंडिया उपक्रमाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले. त्यांनी म्हटले
“ऑटोमोबाईल क्षेत्रातील आमची भागीदारी जगाला माहिती आहे. आता एकत्रितपणे आपण बॅटरी, रोबोटिक्स, सेमीकंडक्टर, जहाज बांधणी आणि अणुऊर्जा क्षेत्रात नव्या यशकथा लिहू शकतो. तसेच आपण आफ्रिका आणि जागतिक दक्षिणेच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.”
मोदींनी मागील ११ वर्षांच्या भारतातील परिवर्तनाची आठवण करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की आज भारतात राजकीय स्थिरता, आर्थिक मजबुती आणि धोरणातील पारदर्शकता आहे. हे सर्व घटक गुंतवणूकदारांसाठी भारताला अधिक विश्वासार्ह ठिकाण बनवत आहेत.
मोदींचा हा जपान दौरा केवळ आर्थिक गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही. अमेरिकेने भारतावर शुल्क लादल्यानंतर, जपानसोबतची भागीदारी नवी रणनीती म्हणून पाहिली जात आहे. पंतप्रधान मोदी आगामी बैठकीत जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांच्याशी एआय, सेमीकंडक्टर व प्रगत तंत्रज्ञानावर चर्चा करणार आहेत. या व्यतिरिक्त, बुलेट ट्रेन प्रकल्पही चर्चेच्या अजेंड्यावर असण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे हा प्रकल्प भारत-जपान मैत्रीचे प्रतीक मानला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्पच्या ‘या’ दोन चुकांमुळे भारत-चीन आले जवळ; जिनपिंग यांनी भारताला लिहिलेल्या पत्रातील ‘गुपिते’ आली समोर
भारत-जपान संबंध केवळ आर्थिक नात्यापुरते मर्यादित नाहीत. बुद्धधर्माच्या धाग्याने जोडलेली सांस्कृतिक मैत्रीही दोन्ही देशांना जवळ आणते. त्यामुळे आजची आर्थिक भागीदारी या प्राचीन नात्याला अधिक बळ देत आहे. मोदींचा हा जपान दौरा भारतासाठी अनेक स्तरांवर महत्त्वाचा ठरणार आहे. एकीकडे जपानी गुंतवणुकीमुळे भारताच्या उद्योगविश्वाला नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळणार आहे, तर दुसरीकडे तंत्रज्ञान, एआय, सेमीकंडक्टर आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नवी ऊर्जा मिळणार आहे. “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” हा संदेश देत मोदींनी भारताला जागतिक विकासाचा एक प्रमुख भागीदार म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.