पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी सोमवारी जी-७ (G-7) शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन (Joe Biden), फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justine Trudo) यांची भेट घेतली. ग्रुप फोटो काढण्यापूर्वी या नेत्यांमध्ये संभाषण झाले होते. यावेळी, सर्व नेत्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी कॅनडाच्या पंतप्रधानांशी संवाद साधताना दिसले. ग्रुप फोटोनंतर मोदी आणि मॅक्रॉन यांनी मिठी मारली आणि संवाद साधला.
रात्री दोन्ही नेत्यांची द्विपक्षीय बैठक होणार आहे. जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी रविवारपासून दोन दिवसांच्या जर्मनी दौऱ्यावर आहेत. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ (Olaf Scholz) यांनी त्यांचे दक्षिण जर्मनीतील शिखर परिषदेत स्वागत केले. शिखर परिषदेच्या ठिकाणी आत गेल्यावर दोन्ही नेत्यांनी चर्चा सुरू ठेवली आणि एकत्र आत गेले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची भेट घेतली, असे पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर म्हटले आहे. ‘जी-७ जागतिक स्तरावर नेत्यांसोबत समिट’, असे कॅप्शन दिले आहे. मे महिन्यात जपानमधील क्वाड समिटमध्ये भेटल्यानंतर मोदी आणि बायडन यांच्यात ही पहिलीच भेट होती. जर्मन प्रेसीडेंसीने अर्जेंटिना, भारत, इंडोनेशिया, सेनेगल आणि दक्षिण आफ्रिकेला बव्हेरियातील इल्लामाऊ येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले आहे.