PM Modi Visit Mauritius receives grand welcome
पोर्ट लुइस: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवासांच्या अधिकृत दौऱ्यासाठी मॉरिशसमध्ये पोहोचले आहेत. यादरम्यान पंतप्रधान 12 मार्च रोजी होणाऱ्या मॉरिशच्या राष्ट्रीय सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतील नौदलाच्या जहाजासह नौदलाची एक तुकडीही या समारंभाला उपस्थित राहणार आहे. या दौऱ्यादरम्यान भारत आणि मॉरिशसमधील क्षमता विकास, व्यापर आणि सीमा ओलांडून होणाऱ्या गुन्ह्यांविरुद्ध सहकार्य वाढवण्याचे विविध करार करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदींचे भव्य स्वागत
पंतप्रधान मोदींचे आगमन होताच मॉरिशसच्या प्रमुख नेत्यांनी भव्य स्वागत केले. मॉरिशचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मोदी यांना हार घालून सन्मान दिला. त्यांंच्या स्वागतासाठी उपपंतप्रधान, मॉरिशचे मुख्य न्यायाधीश, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, परराष्ट्र मंत्री, मंत्रिमंडळ आणि अनेक तज्ज्ञ व्यक्ती उपस्थित होत्या. 200 हून अधिक मान्यवर, खासदार आमदार, राजनैतिक नेते आणि धार्मिक नेत्यांनी पंतप्रधान मोदींच्या आगमनाचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदींची पोस्ट
मॉरिशसला पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत आपाल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “मी मॉरिशसला पोहोचलो आहे. माझे मित्र पंतप्रधान डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांनी विमानतळावर केलेल्या स्वागताबद्दल मी आभार मानतो. ही भेट भारत आणि मॉरिशसमधील मैत्री अधिक दृढ करण्याची आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी मोठी संधी आहे. आज मी मॉरिशचे राष्ट्राध्यक्ष धरम गोखूल आणि पंतप्रधान रामगुलाम यांची भेट घेईन. संध्याकाळी एका सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित करेन.”
नरेंद्र मोदी यांची सोशल मीडिया पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मॉरिशस मधील भारतीय समुदायाचा उत्साह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी मॉरिशसच्या पोर्ट लुईस शहरात भारतीय समुदायाच्या नागरिक एकत्र आले होते. भारती समुदायातील सदस्य शरद बरनवाल यांनी म्हटले की, “भारत आणि मॉरिशस यांच्यातीस संबंध नेहमीच दृढ राहिले आहेत, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यामुळे ही मैत्री अधिक बळकट होईल.” तसेच आम्ही सर्वजण खूप उत्साहित आहोत, सगळे सकाळपासून इथे जमलो आहोत.
या मुद्द्यावर विशेष चर्चा होणार
नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यादरम्यान मॉरिशच्या पवित्र हिंदू तीर्थस्थळ गंगा तलावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. 1972 साली येथे भारतातील गंगानदीचे पाणी आणून मिसळण्यात आले होते. हा तलाव भारत आणि मॉरिशसमधील सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानला जातो.