Natanz radiation leak : इराणच्या नतान्झ अणुऊर्जा प्रकल्पावर इस्रायलने नुकताच हल्ला केला, आणि त्याचे पडसाद आता संपूर्ण जगात उमटू लागले आहेत. हा हल्ला वरवरचा होता, असे इराणकडून सांगण्यात आले असले तरी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (IAEA) दिलेली ताजी माहिती धक्कादायक आहे.
IAEA चे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी संयुक्त राष्ट्रांना सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, नतान्झ अणुऊर्जा केंद्रात अणु किरणोत्सर्गाची गळती होत आहे. ही गळती सध्या केंद्राच्या आतील भागात मर्यादित असली तरी ती सातत्याने वाढत आहे, आणि वेळीच उपाययोजना न झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
हल्ला वरवरचा, पण परिणाम खोलवर…
इराणने या हल्ल्यानंतर तात्काळ प्रतिक्रिया देत म्हटले होते की, हल्ला फक्त पृष्ठभागावर झाला असून, युरेनियम समृद्धी किंवा किरणोत्सर्ग गळतीसारखा कोणताही धोका नाही. मात्र, आता IAEA चा अहवाल इराणच्या या दाव्यांना खोटे सिद्ध करत आहे. ग्रोसी म्हणाले की, हल्ल्यामुळे नतान्झ केंद्राच्या वीजपुरवठ्यावर परिणाम झाला असून, सेंट्रीफ्यूज यंत्रणाही बाधित झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतर्गत भागात अणु किरणोत्सर्ग सुरू झाला आहे. हे रेडिएशन अद्याप बाहेर पसरले नसले तरी, यावर नियंत्रण मिळवले नाही तर ते गंभीर स्वरूप धारण करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : ‘जो कोणी इस्रायलसोबत आहे तो आमचा निशाणा’, इराणचा अमेरिकेसह जगाला थेट इशारा; चीनचाही संताप
“रायझिंग लायन” मोहिमेचा भेदक परिणाम
या घटनेच्या मुळाशी इस्रायलची “रायझिंग लायन” मोहीम आहे. इस्रायलने इराणच्या अणु कार्यक्रमावर आघात करण्यासाठी ही व्यापक मोहीम सुरू केली होती. या अंतर्गत इराणमधील अनेक अणु व लष्करी स्थळांवर हल्ले करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 200 हून अधिक लढाऊ विमाने सहभागी होती. IRGC कमांडर हुसेन सलामी आणि खामेनी यांचे मुख्य सल्लागार अली शामखानी हल्ल्यात ठार झाल्याचेही वृत्त आहे.
इराणकडून गळतीच्या बातम्यांना नकार, पण IAEAचा पुनरुच्चार
इराणच्या अणुऊर्जा संस्थेने या सर्व घटनांना खोडून काढत, “सर्व काही नियंत्रणात आहे” असा दावा केला आहे. प्रवक्ते बेहरोझ कमालवंदी यांनी माध्यमांना सांगितले की, हल्ल्यानंतरच्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि केंद्र पुन्हा कार्यान्वित होईल. तथापि, ग्रोसी यांचे म्हणणे वेगळेच चित्र दाखवते. त्यांनी संयुक्त राष्ट्रांपुढे नमूद केले की, इराणमधील अनेक अणुऊर्जा केंद्रांवर प्रत्यक्ष परिणाम झाले आहेत, आणि ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
“अणु केंद्रांना लक्ष्य करणे हे धोकादायक पाऊल” – ग्रोसी
ग्रोसी यांनी या सर्व घडामोडींना संदर्भ देत म्हटले की, जगाच्या कुठल्याही भागातील अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करणे हे गंभीर आहे, आणि त्याचे परिणाम फक्त त्या देशापुरते मर्यादित राहत नाहीत. त्यामुळे त्यांनी सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : तेहरान विमानतळावर स्फोट, तेल अवीवमध्ये हल्ला… रात्रभर इस्रायल आणि इराणमध्ये क्षेपणास्त्र वर्षाव
आणखी एका युद्धाची चाहूल?
इराणमधील अणुऊर्जा केंद्रावर हल्ला आणि त्यानंतर निर्माण झालेली किरणोत्सर्गाची गळती ही केवळ इराणच्या सुरक्षा यंत्रणेचाच प्रश्न राहिलेला नाही, तर ती जागतिक शांततेच्या धाग्यांना हलवणारी घटना ठरत आहे. एकीकडे इराण या हल्ल्याला आंतरराष्ट्रीय मंचावर सामोरे जात आहे, तर दुसरीकडे इस्रायलचा अणु कार्यक्रम संपवण्याचा निर्धारही अधिक बळकट होत आहे. जगात शीतयुद्धाची छाया पुन्हा गडद होत चालली आहे… आणि मृत्यूच्या सावल्या इराणच्या दाराशी संचारू लागल्या आहेत.