इस्रायल-इराण युद्धसदृश तणाव शिगेला: तेल अवीववर क्षेपणास्त्रांचा मारा, तेहरान विमानतळावर स्फोट, १० महत्त्वाच्या घडामोडी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Israel Iran War : इस्रायल आणि इराणमधील संघर्ष आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून दोन्ही देशांनी एकमेकांवर थेट क्षेपणास्त्र हल्ले चढवले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी ( दि 13 आणि 15 जून 2025 ) सकाळपर्यंत अनेक हल्ल्यांची मालिका घडली असून, या संघर्षामुळे संपूर्ण पश्चिम आशिया प्रदेशातील शांतता धोक्यात आली आहे. दोन्ही बाजूंनी आक्रमकता गाठलेली असताना, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्वरित युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, इस्रायलच्या महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्रवर्षाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शनिवारी पहाटे इस्रायलच्या तेल अवीव आणि येरुशलेम या दोन प्रमुख शहरांमध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. इराणकडून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला करण्यात आला, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्रे इस्रायली संरक्षण प्रणालीने रोखली, मात्र काही क्षेपणास्त्रे तेल अवीवमध्ये कोसळली.
इस्रायलने अद्याप हल्ल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, तेल अवीवमध्ये आपत्कालीन बचाव पथके कार्यरत असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलंट यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, इराणने नागरी वस्तीवर क्षेपणास्त्रे डागून लाल रेषा ओलांडली आहे. याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील, असे त्यांनी सूचित केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : ‘जो कोणी इस्रायलसोबत आहे तो आमचा निशाणा’, इराणचा अमेरिकेसह जगाला थेट इशारा; चीनचाही संताप
इस्रायलनेही शनिवारी सकाळी इराणवर प्रत्युत्तरादाखल हल्ला चढवला. तेहरान विमानतळ परिसरात स्फोट झाले, तसेच ड्रोनद्वारे हल्ला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इराणच्या राजधानीत अयातुल्ला खामेनी यांचे निवासस्थान आणि राष्ट्रपतींच्या निवासाजवळ इस्रायली ड्रोन दिसून आला, जो इराणच्या हवाई संरक्षण प्रणालीने पाडला.
शनिवारी सकाळी इराणने हल्ल्यांचा तिसरा टप्पा सुरू केला असून, अनेक क्षेपणास्त्रे व ड्रोन इस्रायलकडे पाठवले जात आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
या तणावाची सुरूवात शुक्रवारी रात्री इस्रायलच्या हल्ल्याने झाली. इस्रायलने इराणच्या अणुशास्त्रज्ञ, लष्करी तळ, व कमांड सेंटरवर हल्ला चढवला, ज्यामुळे इराणने उग्र प्रतिक्रिया दिली.
या दोन्ही देशांच्या हल्ल्यांमुळे गाझा, सीरिया, लेबनॉन व येमेनमध्येही तणाव वाढला आहे. त्यामुळे, पश्चिम आशियात व्यापक युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवरही हल्ले केले, तर इराणने तेल अवीवमध्ये अचूक क्षेपणास्त्र मारा केला, ज्यामुळे जागतिक पातळीवर चिंता वाढली आहे.
यूएन सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी दोन्ही देशांना त्वरित शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे. “युद्ध सुरू राहिल्यास त्याचा फटका संपूर्ण जगाला बसेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ईरानचा तेल अवीववर जोरदार क्षेपणास्त्र हल्ला; इस्रायलच्या ‘Multilayer Air Defense System’ला भेदण्याची यशस्वी चाल
इस्रायल-इराण संघर्षाचे स्वरूप दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. दोन्ही देश अणुशक्तिसज्ज असून, त्यांच्यातील थेट युद्ध जागतिक शांततेला गंभीर आव्हान ठरू शकते. या परिस्थितीत त्वरित शांततामध्ये तोडगा न निघाल्यास पश्चिम आशिया दहशत, अस्थिरता आणि मानवी हानीच्या खाईत लोटला जाऊ शकतो. जगभरातील नेत्यांनी आता युद्ध थांबवण्यासाठी ठोस भूमिका घेण्याची गरज आहे.