सीरियात बंडखोरांचा लष्करी तळांवर हल्ला; 60 हून अधिक लोकांचा मृत्यू
दमास्का: सीरियात बंडखोर गटांनी लष्करी तळांवर हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्या 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 4 वर्षात बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात हा हल्ला सर्वात मोठा असल्याचे म्हटले जात आहे. सीरियाच्या लष्करी तळांवर हल्ले करुन शस्त्रे आणि वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. असे म्हटले जात आहे की, या बंडखोर गटांपैकी तहररी अल-शाम या गटाला अल कायद्याचा पाठिंबा मिळाला आहे. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा सीरियामध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सरकारची लष्करी तळे बंडखोरांच्या ताब्यात
सीरियातील सर्वात मोठे शहर अलेप्पोच्या आसपास 10 तासांत अनेक गावे ताब्यात घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. दावा करण्यात आला आहे की, या बंडखोरांनी सरकारच्या 46 लष्करी तळांवर कब्जा केला आहे. बंडखोरांनी बशर अल-असद सरकारला पाठिंबा देणाऱ्या सैन्याची शस्त्रे आणि वाहने शस्त्रे आणि वाहने लुटल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, सीरियन सरकारने यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.2020 मध्ये, तुर्कीच्या मदतीने, बंडखोर आणि असाद सरकारमध्ये एक करार झाला, ज्यामुळे तेथे मोठे हल्ले कमी झाले.
2011 मध्ये युद्धाला सुरूवात
2011 मध्ये अरब स्प्रिंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सीरियात गृहयुद्ध सुरू झाले होते. बशर अल-असद यांच्या हुकूमशाहीविरोधात लोकशाहीची मागणी करणाऱ्या निदर्शनांमुळे फ्री सीरियन आर्मी नावाचा बंडखोर गट तयार झाला. त्यानंतर सीरियातील संघर्ष अधिकच वाढला. अमेरिका, रशिया, इराण, तुर्की यांसारख्या देशांचा सहभाग या संघर्षात होता, तसेच ISIS सारख्या दहशतवादी संघटनांनीही या गृहयुद्धाचा फायदा घेतला.
सीरियात बंडखोरांचा लष्करी तळांवर हल्ला; 60 हून अधिक लोकांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
2020 मध्ये युद्धबंदी करार
2020 मध्ये तुर्कीच्या मदतीने झालेल्या युद्धबंदी करारामुळे संघर्षात काही प्रमाणात शांतता आली होती. परंतु अलीकडील हल्ल्यांमुळे सीरियातील स्थिती पुन्हा अस्थिर होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, दशकभर चाललेल्या या गृहयुद्धात 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक विस्थापित झाले आहेत.
युद्धामुळे सीरियाचे अलेप्पो शहर उद्धवस्त
सीरियातील अलेप्पो हे शहर या युद्धामुळे प्रचंड उद्ध्वस्त झाले आहे. UNESCO च्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या या शहराला सीरियाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र मानले जात होते. परंतु, संघर्षामुळे त्यातील ऐतिहासिक मशिदी, सांस्कृतिक वारसा आणि सुंदर कलाकृती नष्ट झाल्या. आजही अलेप्पो शहर देशातील गृहयुद्धाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. हे शहर 2012 पर्यंत अलेप्पो भागांमध्ये विभागले गेले. या शहराचा एक भाग फ्री सीरियन आर्मीच्या नियंत्रणाखाली तर दुसरा भाग बशर अल-असदच्या नियंत्रणाखाली होता.