नायजेरियामधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. नायजेरियातील (Nigeria) लागोस (Lagos) येथे गुरुवारी रेल्वेने प्रवासी बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर 10 -12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. लागोस स्टेट इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने (LASEMA) ही माहिती दिली आहे.
नायजेरियाच्या नॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे प्रमुख इब्राहिम फारिनलॉय यांनी सांगितले की, बस सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना आंतर-शहर ट्रेनला धडकली. इब्राहिम फारिनलॉय यांनी सांगितले की, या अपघातात आतापर्यंत ८४ जणांना जिवंत वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून त्यात रूग्णालयात मृत्युमुखी पडलेल्यांचाही समावेश आहे. ते म्हणाले की, सर्व घले बसमधील आहेत. ट्रेनमधील एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या पॅरामेडिक्सद्वारे प्राथमिक उपचार केल्यानंतर, जखमींना पुढील वैद्यकीय उपचारासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
लागोस स्टेट इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीचे सेक्रेटरी ओलुफेमी ओके-ओसानिन्टोलू यांनी सांगितले की, अपघाताचे तात्काळ कारण बस चालकाचे बेपर्वा वाहन चालवणे आहे. बस चालकाच्या बेपर्वाईमुळे ही घटना घडल्याचे ओके-ओसानिन्टोलू यांनी सांगितले. ट्रेनला धडकण्यापूर्वी बस चालकाने ट्रेनचा ट्रॅफिक सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक रहिवाशांच्या मते, नायजेरियन शहरांमध्ये ट्रेन आणि ट्रकचे अपघात सामान्य आहेत. येथे वाहतुकीचे नियम सहसा नीट पाळले जात नाहीत. नायजेरियातील सर्वात मोठे शहर आणि व्यावसायिक केंद्र लागोसमध्ये ही एक गंभीर समस्या आहे, असे ते म्हणाले. मात्र, अलीकडच्या काळात या रस्त्यावरील अपघात आणि या प्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक कडक उपाययोजना केल्या आहेत.