SriLanka Drought: दुष्काळाने होरपळल्या श्रीलंकेत आकाशातून प्रार्थना अन् केले पवित्र पाण्याचे शिंपण; विमानातुन बौद्ध भिक्षूंचा दौरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
दक्षिण आशियाई देश श्रीलंका (Sri Lanka) सध्या गेल्या काही दशकांतील सर्वात गंभीर आणि भीषण जलसंकटाचा सामना करत आहे. (SriLanka Drought) देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे नद्या, विहिरी आणि सिंचनाचे जलाशय पूर्णपणे कोरडे पडले आहेत. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या मानवी आणि नैसर्गिक संकटाच्या काळात निसर्गाची अवकृपा दूर व्हावी आणि पर्जन्यवृष्टी व्हावी, यासाठी श्रीलंकेत धार्मिक परंपरेचा आणि आस्थेचा आधार घेतला जात आहे. श्रीलंकन हवाई दलाने (Sri Lanka Air Force) या संकटसमयी एक अनोखा उपक्रम राबवत भगवे वस्त्र परिधान केलेल्या तीन बौद्ध धर्मगुरूंना (भिक्षूंना) विशेष ‘वाय-१२’ (Y-12) लष्करी विमानातून दुष्काळग्रस्त भागांवरून हवाई सफरीवर नेले.
आकाशात उडणाऱ्या या विमानातून बौद्ध भिक्षूंनी देशात पर्जन्यवृष्टी व्हावी आणि दुष्काळाच्या झळा कमी व्हाव्यात यासाठी विशेष प्रार्थना (पिरिथ पठण) केली. या प्रार्थनेसोबतच विमानातून खाली दुष्काळग्रस्त जमिनीवर, वाळलेल्या शेतांवर आणि कोरड्या जलाशयांवर पवित्र पाण्याचे शिंपण करण्यात आले. श्रीलंकन हवाई दलाने सोशल मीडियावर या मोहिमेचे फोटो आणि माहिती शेअर करताना लिहिले की, “जेव्हा संपूर्ण देश कोरड्या हवामानाच्या आणि भीषण दुष्काळाच्या छायेत आहे, तेव्हा हे विमान आकाशात करुणेचे आणि आशेचे प्रतीक म्हणून उडत आहे.”
श्रीलंकेच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिण प्रांतांना या दुष्काळाचा सर्वात मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या अहवालानुसार, देशातील अनेक कृषी क्षेत्रांमध्ये सामान्य पावसाच्या तुलनेत ८५ ते १०० टक्के कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतजमिनींना भेगा पडल्या असून पिके पार वाळून गेली आहेत. ग्रामीण भागातील आणि शहरांमधील विहिरी तसेच लहान-मोठे जलाशय तळाशी गेले आहेत. काही मुख्य जलाशयांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या अवघे १० ते ५० टक्के पाणीच शिल्लक राहिल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S. Jaishankar UNGA Speech: संयुक्त राष्ट्रांच्या 81 व्या महासभेत एस. जयशंकर मांडणार भारताची भक्कम भूमिका; ‘या’ दिवशी होणार भाषण
पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी सरकारला दूरवरच्या भागांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, काही अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांतील नागरिकांना पाण्याच्या एका टँकरसाठी तब्बल २३-२३ दिवस वाट पाहावी लागत आहे. पाण्याच्या या तीव्र टंचाईमुळे केवळ मानवी जीवनच विस्कळीत झाले नाही, तर पशुधनाचा आणि पाळीव प्राण्यांचाही पाण्यासाठी तडफडून मृत्यू होत असल्याची बिकट परिस्थिती समोर येत आहे.
श्रीलंकेतील हे संकट केवळ पिण्याच्या पाण्यापुरते किंवा शेतीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर याचा थेट फटका देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बसत आहे. जलविद्युत निर्मिती करणाऱ्या प्रमुख जलाशयांमधील पाणी पातळी निम्म्याहून अधिक खाली घसरल्यामुळे देशात वीज निर्मितीवर मोठा ताण आला आहे. जर लवकर मुसळधार पाऊस झाला नाही, तर देशात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग आणि ऊर्जा संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे, निसर्ग आणि वन्यजीवांवरही या दुष्काळाचा अत्यंत वाईट परिणाम झाला आहे. श्रीलंकेतील जगप्रसिद्ध आणि सर्वात मोठे अभयारण्य मानल्या जाणाऱ्या ‘याला राष्ट्रीय उद्यानातील’ (Yala National Park) पाण्याचे स्रोत सुकल्यामुळे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे प्रशासनाला या राष्ट्रीय उद्यानातील एकूण ६ विभागांपैकी २ विभाग पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करावे लागले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : UNGA 2026 : युद्धाच्या छायेत मोठी राजनैतिक घडामोड; UN महासभेत ट्रम्प-इराण राष्ट्राध्यक्षांची होणार भेट? जगाचे लक्ष न्यूयॉर्ककडे
हवामान तज्ज्ञांच्या मते, श्रीलंकेतील या भीषण परिस्थितीला जागतिक हवामान बदलाचा आणि ‘एल निनो’ (El Niño) या नैसर्गिक हवामान घटकाचा तीव्र प्रभाव कारणीभूत आहे. एल निनोमुळे प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानात वाढ होते, ज्यामुळे वाऱ्यांचा वेग आणि पावसाची पद्धत जगभरात बदलते. यंदाचा एल निनो अत्यंत तीव्र स्वरूपाचा असल्याने श्रीलंकेत पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे.
श्रीलंकेच्या हवामान विभागाने पुढील काळासाठी अत्यंत गुंतागुंतीचा इशारा दिला आहे. सप्टेंबरच्या अखेरीपासून ते डिसेंबर या काळात देशातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परंतु, या पावसाच्या ओघांतर पुन्हा एकदा तीव्र दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे एका बाजूला अवकाळी मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला भीषण कोरडा दुष्काळ अशा दुहेरी संकटाचा सामना श्रीलंकेतील नागरिकांना करावा लागत आहे.






