Syria's Ahmed al-Sharaa Declared Syria's Transitional President
दमास्कस: गेल्या वर्षी 2024 मध्ये बंडखोर गट अल-शाम तहरीरने दहशतवादी हल्ले केले आणि सीरियातील असदची सत्ता संपुष्टात आणली. त्यानंतर सीरियाचे नेतृत्व अल-शाम तहरीर गटाचे प्रमुख अल जुलानी यांच्या नेतृत्वाखाली आले. आता मोहम्मद अल-जुलानी यांनी बुधवारी राजधानी दमास्कसमध्ये संविधान रद्द करून स्वतःला राष्ट्रपती घोषित केले आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ उडाली आहे.
सीरियाची संसद देखील बरखास्त
इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कमांडर हसन अब्देलघानी यांनी देशात पूर्ण स्थिरता येईपर्यंत जुलानी राष्ट्रपती पदावर राहणार असल्याची माहिती दिली आहे. याशिवाय सीरियाची संसद देखील बरखास्त करण्यात आली आहे. तर नव्या संविधानाच्या अंमलबजावणीपर्यंत तात्पुरत्या विधान परिषदेची स्थापना करण्यात येणार आहे. मात्र, यासाठी कोणतीही वेळमर्यादा नाही.
असद पार्टीशी संबंधित सर्व संघटना, संस्था बरखास्त
तसेच अब्देलघानी यांनी असेही स्पष्ट केले की, माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांच्या पार्टीशी संबंधित सर्व संघटना आणि संस्था बरखास्त केल्या जाणार असून त्यांची सर्व मालमत्ता नवीन सरकारच्या नेतृत्वाखाली येणार आहे. गेल्या महिन्यात HTS गटाने सीरियामध्ये तख्तापलट करून राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला होता.
यामुळे असद कुटुंबाच्या 54 वर्षांच्या सत्तेचा अंत झाला. माजी राष्ट्रपती बशर अल-असद यांनी पळून जाऊन मॉस्कोमध्ये आश्रय घेतला होता आणि आता सीरियावर अल-जुलानी यांच्या अल-शाम तहरीर गटाचे वर्चस्व असणार आहे.
तख्तापलट कसा घडला?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2016 मध्ये सीरियाचे गृहयुद्ध थांबल्यानंतर, जुलानी आपल्या लढाऊ शक्तीला मजबूत करण्यासाठी लागले. चीनच्या उईगर मुस्लिमांपासून ते अरब आणि मध्य आशियातील लोकांच्या मदतीने त्यांनी आपली फौज तयार केली. त्यानंतर इस्त्रायल-हमास आणि रशिया युक्रेन युद्धाच्या वेळी त्यांना योग्य संधी मिळाली. यावेळी रशिया युक्रेन युद्धात व्यस्त असताना त्याने सीरियातून आपले सैन्य काढून घेतले.
तर 2023 मधील इस्त्रायल-हमास युद्धामुळे, इराण आणि हिजबुल्लाह सैन्य देखील सीरियातून हटवण्यात आले. हसन नसरल्लाह यांच्या मृत्यूनंतर हिजबुल्लाह कमकुवत झाले. या संधीचा फायदा घेत, जुलानी यांनी सीरियन सैन्यावर हल्ला करून 11 दिवसांत राष्ट्रपतींचा सत्तापालट केला. सीरियातील या सत्तापालटामुळे देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले आहेत.
या देशांना धोका
सीरियात विद्रोही गटांचे सत्तास्थापन झाल्यास हा बदल अमेरिका, रशिया, इराण तुर्की आणि इस्त्रायल या देशांच्या हितसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे जुलानी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार कसे कार्य करेल आणि सीरियाचा भविष्यातील मार्ग कसा असेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.