Paetongtarn Shinawatra crisis : थायलंडमध्ये एका १७ मिनिटांच्या फोन कॉलमुळे मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. पंतप्रधान पतोंगटार्न शिनावात्रा आणि कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांच्यातील खासगी संभाषण लीक झाल्यानंतर देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. संभाषणात पतोंगटार्न यांनी हुन सेन यांना ‘काका’ असे संबोधले आणि सीमावादाच्या पार्श्वभूमीवर थायलंडच्या लष्करी अधिकाऱ्यावर टीका केली. या प्रकारामुळे राष्ट्रवादी संघटनांमध्ये संताप उसळला असून, सरकारवरील युतीचा पाठिंबाही कमी झाला आहे.
राजकीय खळबळ आणि जनता रस्त्यावर
फोन संभाषणाचे ध्वनिमुद्रण लीक होताच राजधानी बँकॉकमध्ये शेकडो निदर्शकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. थाई जनता आणि विरोधी पक्षांनी संसद बरखास्त करण्याची, तसेच नव्या निवडणुकांची मागणी केली आहे. यामुळे सत्तारूढ पक्षाच्या नेतृत्वावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
हुन सेन यांच्याकडून फेसबुकवर खुलासा
कंबोडियाचे माजी पंतप्रधान हुन सेन यांनी हा संभाषणाचा भाग फेसबुकवर शेअर केला, जो आधी फक्त ८० अधिकाऱ्यांना पाठवला गेला होता. हा संवाद सार्वजनिक केल्याने दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव अधिकच तीव्र झाला आहे. थायलंडमध्ये सीमावाद आधीच चिघळलेला असताना, अशा प्रकारचे ‘मैत्रीपूर्ण संबोधन’ आणि सैन्याच्या विरोधातील विधान लोकांच्या आत्मसन्मानावर घाव घालणारे ठरले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Operation Sindoor’नंतर पाकिस्तानची मोठी कबुली; युद्धबंदीसाठी जयशंकर यांना केली होती विनंती
थाई सैन्य अस्वस्थ, सत्तापालटाची भीती
संवादामध्ये सीमावर्ती भागाचे नेतृत्व करणाऱ्या एका थाई लष्करी अधिकाऱ्याला ‘विरोधक’ म्हणून संबोधण्यात आल्याने थाई सैन्य अत्यंत अस्वस्थ झाले आहे. देशाच्या राजकीय इतिहासात अनेक वेळा लष्करी हस्तक्षेप झालेले असल्याने, पुन्हा एकदा सत्तापालटाची भीती व्यक्त केली जात आहे. पंतप्रधानांच्या विधानाने लष्कराच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.
युतीतील मोठा घटकपक्ष बाहेर, बहुमत धोक्यात
या स्फोटक परिस्थितीत सरकारला सर्वात मोठा धक्का बसला आहे तो म्हणजे भूमजैथाई पक्षाने युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. भूमजैथाई हा युतीतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष होता. त्यांच्या माघारीनंतर सरकारचे बहुमत धोक्यात आले आहे. विरोधी पक्षनेते नट्टाफोंग रुएंगपान्यावुत यांनीही संसद बरखास्त करण्याची आणि नव्या लोकशाही प्रक्रियेची मागणी केली आहे. त्यांचा आरोप आहे की, पंतप्रधानांनी राष्ट्रीय हितांशी तडजोड केली आहे.
थायलंड-कंबोडिया सीमावादाचे राजकारण
थायलंड आणि कंबोडियामध्ये ८१७ किमी लांबीची सीमा आहे, त्यातील अनेक भाग वादग्रस्त आहेत. या वादाचा केंद्रबिंदू ठरतो तो ११व्या शतकातील युनेस्को जागतिक वारसा स्थळ. १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हा भाग कंबोडियाला दिला असला, तरी आजूबाजूचा ४.६ चौरस किमी परिसर अजूनही वादात आहे. नुकत्याच घडलेल्या सीमावर्ती गोळीबाराच्या घटनेमुळे जनतेचा आक्रोश वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : इराण-इस्रायल संघर्षात हुकूमशाहाची उडी! उत्तर कोरियाची तिखट प्रतिक्रिया, डोनाल्ड ट्रम्प यांचा संयम संपला
सत्तास्थितीत अनिश्चिततेचे ढग
एक फोन कॉल, एक चुकीची प्रतिक्रिया आणि त्यात भर म्हणून सीमावाद – या सगळ्यांनी थायलंडचे राजकारण प्रचंड अस्थिर केले आहे. पतोंगटार्न यांचे नेतृत्व धोक्यात आले असून, सरकार कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. आता पाहावे लागेल की, थाई जनता आणि लष्कर या प्रकरणावर कसे प्रतिक्रिया देतात, आणि देशातील पुढील राजकीय दिशा काय असेल.