अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष आज ठरणार; मतदानानंतर लगेच होणार मतमोजणी
वॉशिंग्टन : अमेरिकेत बहुचर्चित, बहुप्रतिक्षित राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. यामध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि माजी राष्ट्राध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत होत असल्याचे दिसून आले. मंगळवारी सायंकाळी साडेपाचपासून मतदानाला सुरुवात झाली, जी अनेक राज्यांमध्ये बुधवारी सकाळपर्यंत सुरू राहणार आहे.
हेदेखील वाचा : US Election : एकीकडे मतदान तर दुसरीकडे मतमोजणी सुरू; कमला हॅरिस, ट्रम्प यांच्यात काट्याची टक्कर
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या निवडणुकीसाठी लढत सुरू आहे. त्यातच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी मिशिगनमध्ये कमला हॅरिस यांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. अमेरिकेत एकूण 18.65 कोटी अमेरिकन मतदार मतपेटीत आपले मते टाकतील.
त्यात इंडियाना आणि केंटकी राज्यांच्या काही भागांमध्ये 6 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 4.30 वाजता मतमोजणी सुरू होईल. यानंतर वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या वेळी मतमोजणी सुरू होईल, अशी देखील माहिती दिली जात आहे.
पहिला निकाल येतोय समोर
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पहिला निकाल खूपच धक्कादायक आहे, ज्याचा एकूण निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, यावरून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची आणि जवळची असल्याचे दिसून येते. डिक्सव्हिल नॉच, न्यू हॅम्पशायर येथे दोन प्रमुख डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन उमेदवारांमधील मतांमध्ये बरोबरी आहे.
2016 मध्ये ट्रम्प यांना डिक्सव्हिल नॉचमध्ये केवळ 2 मते
कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मते 3-3 अशी विभागली गेली, जी डिक्सव्हिल नॉचच्या इतिहासात ट्रम्प यांना मिळालेली सर्वाधिक मते आहेत. 2016 मध्ये ट्रम्प यांना डिक्सव्हिल नॉचमध्ये केवळ 2 मते मिळाली होती, तर हिलरी क्लिंटन यांना 4 मते मिळाली होती, तर 2020 मध्ये जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा 5-0 असा पराभव केला होता.
अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पेनसिल्व्हेनियाला मोठं महत्त्व
अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पेनसिल्व्हेनिया राज्याला मोठं महत्त्व आहे. पेनसिल्व्हेनिया स्विंग स्टेट म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये 12 पैकी 10 उमेदवारांना पेनसिल्व्हेनियाच्या मतदारांनी निवडून दिलं आहे. तसंच पेनसिल्व्हेनियातून जिंकलेल्या उमेदवाराने गेल्या आठ निवडणुकांमध्ये मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्येही विजय मिळवला आहे. त्यामुळे या राज्यांना ‘ब्लू वॉल्स’ म्हणून ओळखलं जातं.
हेदेखील वाचा : अंतराळातून सुनिता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी करू शकणार मतदान; जाणून घ्या कसे