कमला हॅरिस, ट्रम्प यांच्याच काट्याची टक्कर
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदानाला सुरुवात झाली असून कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प याच्यात कडवी लढत सुरू आहे. डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिक पक्षांच्या उमदेवारांनी मतदारांना मतदान केंद्रावर आणण्यासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. दरम्यान काही राज्यांमध्ये मध्यरात्रीपासून मतदानाला सुरुवात झाली होती. त्यानंतर मतमोजनी सुरू झाली असून हॅरिस आणि ट्रम्प यांना प्रत्येकी ३ मतं मिळाली आहेत.
हेही वाचा-Maharashtra Election 2024: एकाच नावाचे दोन अपक्ष उमेदवार वाढणार प्रस्थापित उमेदवारांसाठी डोकेदुखी
कॅनडाच्या सीमेला लागून असलेल्या न्यू हॅम्पशायरमध्ये सोमवारी मध्यरात्री मतदानाला सुरुवात झालं होतं. यानंतर न्यू हॅम्पशायरच्या डिक्सविले नॉचमध्ये मतमोजणी सुरू झाली असून आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्येकी तीन मते मिळाली आहेत. वास्तविक, निवडणूक नियमांनुसार, 100 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागात मध्यरात्री मतदान सुरू होतं. डिक्सव्हिल नॉचच्या स्थानिक लोकांनी 2020 मध्ये जो बिडेन यांना मतं दिली होती.
दरम्यान अध्यपदाच्या या निवडणुकांचे निकाल जाहीर होण्यास काही दिवस लागू शकतात. नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025 मध्ये पदाची शपथ घेतील. दोन्ही उमेदवारांनी स्विंग राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे. पॉप स्टार्सपासून ते अनेक हाय प्रोफाईल नेत्यांपर्यंत अनेकजण कमला हॅरिसच्या समर्थनार्थ उभे आहेत, तर इलॉन मस्क आणि मेल गिब्सनसारख्या प्रसिद्ध व्यक्तींनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला आहे.
अमेरिकेच्या निवडणुकांमध्ये पेनसिल्व्हेनिया राज्याला मोठं महत्त्व आहे. पेनसिल्व्हेनिया स्विंग स्टेट म्हणून प्रसिद्ध आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये 12 पैकी 10 उमेदवारांना पेनसिल्व्हेनियाच्या मतदारांनी निवडून दिलं आहे. तसंच पेनसिल्व्हेनियातून जिंकलेल्या उमेदवाराने गेल्या आठ निवडणुकांमध्ये मिशिगन आणि विस्कॉन्सिन या राज्यांमध्येही विजय मिळवला आहे. त्यामुळे या राज्यांना ‘ब्लू वॉल्स’ म्हणून ओळखलं जातं.
दरम्यान स्थानिक मीडिया हाऊस न्यूयॉर्क टाइम्सच्या सर्वेक्षणानुसार, मतदानाच्या दिवशीच्या सर्वेक्षणावर विश्वास ठेवला तर कमला हॅरिस यांना 1 टक्के जास्त मते मिळताना दिसत आहेत. सर्वेक्षणानुसार अमेरिकेच्या निवडणुकीत त्यांना 49 टक्के मते मिळत असल्याचे दिसत आहे. तर डोनाल्ड ट्रम्प यांना ४८ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील मिशिगनमध्ये शेवटची निवडणूक रॅली केली. यावेळी त्यांनी कराचा बोजा कमी करणे आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबवणे या आपल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला. त्यांनी यावर्षी 900 हून अधिक रॅली काढल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान मतदान होण्यापूर्वी 17 राज्यांमध्ये नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहे. ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि नेवाडा या राज्यांमध्ये 600 नॅशनल गार्ड कॉर्प्स स्टँडबायवर ठेवण्यात आले आहेत. FBI ने निवडणूक प्रक्रियेवर चोवीस तास देखरेख ठेवण्यासाठी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल इलेक्शन कमांड पोस्ट तयार केले आहे.