The Taliban has now created a suicide drone army that can attack any city in Pakistan
Taliban Suicide Drone : तालिबानच्या नव्या हालचालींमुळे पाकिस्तानसाठी आणखी एक डोकेदुखी समोर आली आहे. अफगाणिस्तानवर पूर्ण ताबा मिळवलेल्या तालिबानने आता एक घातक ‘सुसाइड ड्रोन आर्मी’ तयार केली आहे, जी पाकिस्तानच्या कुठल्याही शहरावर हल्ला करू शकते. ही ड्रोन फोर्स इतकी प्रगत आहे की ती क्षणार्धात कराची, रावळपिंडी, इस्लामाबाद अशा प्रमुख शहरांना लक्ष्य करू शकते, असा इशारा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिला आहे.
तालिबानने बनवलेली ही ड्रोन सेना म्हणजे एक प्रकारचा स्वयंचलित आत्मघातकी हल्ल्यांचा संच आहे. हवाई शक्तीच्या रूपात तयार करण्यात आलेल्या या ड्रोन फोर्समध्ये केवळ ड्रोन नव्हे, तर काही हेलिकॉप्टरचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. या संपूर्ण शक्तीला ‘कामिकाझे ड्रोन आर्मी’ असे टोकाचे नाव देण्यात आले आहे.
डेली मेल या ब्रिटनमधील वृत्तपत्राने दिलेल्या माहितीप्रमाणे, तालिबानने आपल्या या नवीन ड्रोन शक्तीची चाचणी माजी ब्रिटिश एसएएस बेसवर सुरू केली आहे. यामधून दिसून येते की, तालिबान आता केवळ जमिनीवर नव्हे, तर हवेतूनही हल्ले करण्यासाठी सज्ज आहे. सध्या या ड्रोन यंत्रणांची विविध अंगांनी चाचणी सुरू आहे. तालिबानचे म्हणणे आहे की, हे ड्रोन शत्रू राष्ट्रांवर हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, ही शक्ती तयार करणाऱ्या संघात एक असा अभियंता आहे, ज्याच्यावर ओसामा बिन लादेनच्या दहशतवादी नेटवर्कशी संबंधित असल्याचा आरोप आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Space Warfare : चीनने अवकाशातही सैन्य उभारले, 360 उपग्रहांमध्ये बसवली शस्त्रे, भारतही सज्ज
अहवालानुसार, तालिबानने ड्रोन उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी अंतरराष्ट्रीय पातळीवरील अभियंते आणि तज्ज्ञांची भरती केली जाणार आहे. ही गोष्ट फक्त पाकिस्तानसाठीच नव्हे, तर पाश्चिमात्य राष्ट्रांसाठीही गंभीर धोक्याची घंटा मानली जात आहे.
पाकिस्तान सध्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेचा सामना करत आहे. अशा काळात, तालिबानसारख्या शेजारीकडून आलेला हवाई हल्ल्याचा धोका या देशासाठी नवे संकट बनू शकतो. विशेषतः कराची, रावळपिंडी, लाहोरसारख्या शहरे या ड्रोन हल्ल्यांच्या टप्प्यात येतात, याची स्पष्ट शक्यता आहे.
रशिया-युक्रेन युद्धात दिसून आलं की, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर आता पारंपरिक युद्धाच्या पद्धती बदलत आहे. युक्रेनने नुकतेच रशियाच्या हवाई तळांवर ड्रोन हल्ले करून मोठं नुकसान केलं. भारतानेही ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांमध्ये ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला. त्यामुळे आता ड्रोन हे केवळ साधन नाही, तर एक स्वतंत्र युद्धशक्ती ठरू लागली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे चीनशी संबंध का चांगले नाहीत? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका ओळीत दिले उत्तर
तालिबानच्या या नव्या ड्रोन एअर फोर्समुळे दक्षिण आशियात सुरक्षा धोक्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. पाकिस्तानसारख्या देशाला या नव्या तंत्रज्ञानासोबत सामोरे जाण्यासाठी संरक्षण यंत्रणा बळकट करावी लागेल. कारण या ‘कामिकाझे ड्रोन आर्मी’चा वापर केव्हा, कुठे, कशासाठी होईल, हे कोणालाही सांगता येणार नाही. युद्ध आता डिजिटल आणि आभासी रूपात घुसत चालले आहे आणि या बदलत्या युद्धपद्धतीत तयारीचा अभाव म्हणजे विनाशाला आमंत्रण ठरू शकतो.