Trump discussing TikTok purchase with multiple people will take decision in 30 days
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकवरील बंदीच्या मुदतीत 90 दिवसांची वाढ केली होती. माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या टिकटॉक बंदीच्या निर्णय पलटवत ट्रम्प यांनी अमेरिकत टिकटॉवरली बंदी स्थगित केली होती. मात्र, आता पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या भविष्याबाबत संकेत दिले आहेत. ट्रम्प यांनी टिकटॉक खरेदी करण्याचा विचार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ते टिकटॉक खरेदीसाठी अनेक लोकांशी चर्चा करत आहेत आणि या लोकप्रिय ॲपच्या भविष्यावर येत्या 30 दिवसांत निर्णय घेतला जाईल.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर टिकटॉकवर लागू करण्यात आलेली बंदी हटवली होती. त्यांनी अधिकाऱ्यांना टिकटॉकला थोडा वेळ देण्याचे आदेश दिले होते आणि या ॲपवर असलेले निर्बंध तात्पुरते स्थगित केले होते. फ्लोरिडाला रवाना होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले होते की, “मी टिकटॉकबाबत अनेक लोकांशी चर्चा केली आहे आणि लोकांना टिकटॉकमध्ये खूप रस आहे.”
ट्रम्प यांचा निर्णय आणि ओरेकलची चर्चा
इंग्रजी वृतसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रम्प प्रशासन टिकटॉकला वाचवण्यासाठी सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकल आणि बाह्य गुंतवणूकदारांच्या समूहासोबत काम करत आहे. या कराराच्या अंतर्गत, टिकटॉकच्या मालकी हक्काचा काही भाग चीनस्थित बाइटडान्सकडे राहील. मात्र, डेटा संकलन आणि सॉफ्टवेअर अपडेटचे व्यवस्थापन ओरॅकलकडे देण्यात येणार आहे. ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी ओरेकलच्या लॅरी एलिसनसोबत याबाबत अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही.
चीनी कंपनी बाइटडान्सची भूमिका
ट्रम्प प्रशासनाने टिकटॉकच्या जागतिक ऑपरेशन्सचा काही भाग अमेरिकेच्या गुंतवणूकदारांना हस्तांतरित करण्याचा विचार सुरू केला आहे. या करारानुसार, बाइटडान्स ही चीनी कंपनी टिकटॉकमध्ये अल्पसंख्याक भागीदार राहील, परंतु एल्गोरिदम, डेटा संकलन, आणि सॉफ्टवेअर अपडेट्स ओरेकलद्वारे हाताळले जातील. यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांना या ॲपमध्ये नियंत्रण हक्क मिळू शकेल.
जो बायडेन यांनी लागू केलेली होती टिकटॉकवरील बंदी
याआधी, 2024 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. बाइटडान्स कंपनी एक चीनी कंपनी असल्याने, अमेरिकन नागरिकांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरला जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. बायडेन यांनी या संदर्भातील विधेयकावर स्वाक्षरी केली होती, यामुळे टिकटॉकवर कडक निर्बंध लादले गेले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, त्यांनी अनेक लोकांशी चर्चा केली असून, टिकटॉक खरेदी करण्याबाबत लोकांची रुची आहे. त्यांनी स्पष्ट केले की, या निर्णयासाठी काँग्रेसने 90 दिवसांचा कालावधी दिला आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की, योग्य निर्णय घेतल्यास टिकटॉक अमेरिकेत पुन्हा लोकप्रियता मिळवू शकेल.