
Trump accused some countries naming Pakistan of secret nuclear tests, after which India responded to Pakistan’s nuclear program
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘गुप्त अणुचाचण्यां’वरील विधानात पाकिस्तानचे नाव घेतल्यामुळे नवा आंतरराष्ट्रीय वाद उभा.
भारताने पाकिस्तानच्या दशकांपासून सुरू असलेल्या अणु तस्करी आणि बेकायदेशीर निर्यात उल्लंघनांचा उल्लेख करत कठोर टीका केली.
पाकिस्तानने ट्रम्प यांच्या विधानाचा भारत ‘विपर्यास’ करत असल्याचा आरोप; दिल्ली बॉम्बस्फोटावरही स्पष्टीकरण.
Trump Pakistan China nuclear claim : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प( Donald Trump) यांनी अलीकडेच एका निवेदनात काही देश “गुप्त अणुचाचण्या”(Secret nuclear tests) करत असल्याचा गंभीर आरोप केला. या वक्तव्यात त्यांनी थेट पाकिस्तानचे नाव घेतल्याने इस्लामाबादमध्ये खळबळ उडाली आहे. हा मुद्दा इतका तापला की आता भारत–पाकिस्तान–अमेरिका तिघांमध्येच नवा राजनैतिक वाद निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत अणुचाचण्यांबाबत झालेल्या चर्चेत दक्षिण आशिया नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. त्यामुळेच ट्रम्प यांच्या या आरोपाला जागतिक माध्यमांमध्येही मोठे महत्त्व मिळाले. पाकिस्तानने तत्काळ प्रत्युत्तर देत आरोप फेटाळले, तर भारताने पाकिस्तानच्या भूतकाळातील अणु तस्करीच्या घटनांचा उल्लेख करून परिस्थिती अधिकच गंभीर केली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Aurora Borealis: अमेरिका-कॅनडाच्या आकाशात रंगांची उधळण; ‘नॉर्दर्न लाईट्स’ने दाखवले स्वर्गीय दृश्य, पहा VIDEO
इस्लामाबादमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ताहिरा अंद्राबी यांनी ट्रम्प यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भारतावर थेट शब्दबाण झाडले. त्या म्हणाल्या:
“भारत स्पष्टपणे तथ्यांचा विपर्यास करत आहे आणि ट्रम्प यांच्या विधानाचे चुकीचे चित्रण करत आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की पाकिस्तानने शेवटची अणुचाचणी मे 1998 मध्ये केली होती आणि त्यानंतर अणुचाचण्यांबाबत पाकिस्तानची भूमिका पूर्णपणे पारदर्शक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये अणुचाचण्यांवर बंदी आणणाऱ्या ठरावांना पाकिस्तान सातत्याने पाठिंबा देत आल्याचेही त्यांनी सांगितले.
अंद्राबी यांनी भारताकडून होत असलेल्या “खोट्या आरोपांवर” संताप व्यक्त करताना म्हटले:
“गुप्त किंवा बेकायदेशीर अणुसंबंधी कारवायांचे आरोप पूर्णपणे निराधार आणि दुर्भावनायुक्त आहेत.”
ट्रम्प यांच्या विधानानंतर भारताने दिलेल्या प्रतिसादाने चर्चा आणखी तापली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानवर दशकांपासून अणु सामुग्रीची तस्करी, बेकायदेशीर निर्यात व्यवहार आणि नियंत्रण उल्लंघन केल्याचा आरोप केला.
भारताचे म्हणणे होते की:
“अमेरिकेने जे म्हटले, त्याचा अर्थ बदलण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या अणु कार्यक्रमात पूर्वीपासूनच संशयास्पद हालचाली दिसत आल्या आहेत.”
या भूमिकेमुळे पाकिस्तान आणखीच आक्रमक झाला आणि त्याने भारतावर राजकीय हेतूने आरोप केल्याचा आरोप केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-South Korea : $150 अब्ज ऊर्जा आयातीसाठी भारत सज्ज; कोरिया देणार आधुनिक तंत्रज्ञानाची अमूल्य साथ
या राजनैतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाविषयी पाकिस्तानकडे प्रश्न विचारण्यात आले.
अंद्राबी यांनी स्फोटातील दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचे सांगत सफाई दिली. त्या म्हणाल्या:
“आम्हाला ते लोक कोण आहेत हे माहिती नाही. आम्ही या प्रकरणात कोणत्याही प्रकारे संबंधित नाही.”
दिल्लीतील या भीषण स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता. तपासात एका संशयिताचे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानस्थित संघटनेशी संबंध असल्याचे समोर आले आहे. तपास यंत्रणांच्या मते, जैशने या कारवाईसाठी “रसद व मदत” उपलब्ध करून दिल्याची शक्यता आहे. पाकिस्तानने मात्र ही शक्यता नाकारत भारताच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या संपूर्ण घडामोडीमुळे दक्षिण आशियातील अणु-सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा जागतिक पटलावर चर्चेत आला आहे. भारत–पाकिस्तान संबंध आधीच अनेक मुद्द्यांवर ताणलेले असताना, ट्रम्प यांच्या एका वक्तव्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.