
Ukraine launches first successful attack on Russia with indigenously developed Flamingo missile
युक्रेनने पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीच्या ‘फ्लेमिंगो’ क्रूझ क्षेपणास्त्राने रशियन तेल शुद्धीकरण केंद्रावर अचूक हल्ला केला.
अमेरिकेकडून टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा पुरवठा न मिळाल्याने युक्रेनचा स्वदेशी संरक्षण शक्तीकडे मोठा टप्पा.
3,000 किमी रेंज असलेल्या ‘फ्लेमिंगो’ ला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ‘आतापर्यंतचे सर्वात यशस्वी क्षेपणास्त्र’ घोषित केले.
Ukraine Flamingo missile strike : युक्रेन-रशिया युद्धात (Ukraine-Russia War) आता एक नवीन वळण आले आहे. पाश्चात्य देशांकडून शस्त्रास्त्रांचा पुरवठा अनिश्चित असताना, युक्रेनने स्वावलंबनाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. युक्रेनने पहिल्यांदाच स्वतःच्या बनावटीच्या लांब पल्ल्याच्या ‘फ्लेमिंगो’(Flamingo) क्रूझ क्षेपणास्त्राचा रशियावर यशस्वी वापर केला असून हा हल्ला देशाच्या संरक्षण इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण मानला जात आहे.
गुरुवारी रात्री युक्रेनने रशियातील एका प्रमुख तेल शुद्धीकरण केंद्राला लक्ष्य करत हा प्रहार केला. युक्रेनियन जनरल स्टाफच्या माहितीनुसार, या रात्री अनेक रशियन लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा समन्वित हल्ला करण्यात आला, ज्यात स्वदेशी ‘फ्लेमिंगो’ क्षेपणास्त्राची पहिलीच यशस्वी तैनाती झाली. हल्ल्याचा व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात रात्रीच्या काळोखात तेजाने चमकणारी क्षेपणास्त्रे दिसतात.
‘फ्लेमिंगो’ क्षेपणास्त्र विकसित केले आहे युक्रेनच्या ‘फायरपॉइंट’ नावाच्या स्थानिक संरक्षण स्टार्टअपने. सुमारे 3,000 किलोमीटरच्या जबरदस्त रेंजमुळे हे क्षेपणास्त्र युक्रेनसाठी रणनीतीच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान ठरत आहे. रशियाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करून त्यांची इंधनपुरवठा आणि रसद साखळी कमकुवत करण्याच्या दीर्घकालीन धोरणाचा हा भाग असल्याचे सैन्य सूत्रे सांगतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nuclear Tests : डोनाल्ड ट्रम्प यांनीच केली पाकिस्तानची पोलखोल; पाकच्या अनु चाचण्यांवर केले ‘असे’ खळबळ उडवणारे वक्तव्य
युक्रेनकडून गेल्या काही महिन्यांत रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर झालेले हे चौथे मोठे हल्ले आहे. रशियाची युद्ध यंत्रणा मोठ्या प्रमाणात इंधनावर अवलंबून असल्याने, या सुविधांना लक्ष्य करणे हे युक्रेनसाठी अत्यंत प्रभावी धोरण मानले जाते. या हल्ल्यांमुळे रशियाच्या आर्थिक संसाधनांवरही दबाव वाढत असल्याचे संरक्षण विश्लेषकांचे मत आहे.
युक्रेनने हा स्वदेशी क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरू केला त्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे अमेरिकेकडून टोमाहॉकसारखी महत्त्वाची क्षेपणास्त्रे न मिळणे. युक्रेनने या क्षेपणास्त्रांची मागणी बऱ्याच काळापासून केली होती, परंतु ट्रम्प प्रशासनाने त्यास नकार दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर ‘फ्लेमिंगो’ क्षेपणास्त्राचा यशस्वी वापर हा युक्रेनचा मोठा आत्मविश्वास वाढवणारा टप्पा आहे. देशाला पाश्चात्य मदतीवर पूर्ण अवलंबून राहण्याची गरज उरली नसून, स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचा विकास आता वेगाने वाढू शकतो.
राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी या हल्ल्यानंतर ‘फ्लेमिंगो’चे विशेष कौतुक केले. त्यांनी ते देशाच्या शस्त्रागारातील सर्वात यशस्वी क्षेपणास्त्र असल्याचे म्हटले. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी संकेत दिले होते की युक्रेन ‘फ्लेमिंगो’ आणि ‘रुटा’सारखी स्वदेशी क्षेपणास्त्रे मोठ्या प्रमाणावर विकसित करत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : NOTAM : आधुनिक युद्धाची पहिली लाट भारतावर? चीन आणि पाकिस्तानने सुरु केले ‘असे’ इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध
युद्धात स्वतःची क्षमता उभी करणे हे प्रत्येक देशासाठी निर्णायक ठरते. पाश्चात्य मदतीतील विलंब आणि राजकीय गुंतागुंत लक्षात घेता, युक्रेनने उचललेले हे पाऊल त्याच्या भविष्यकालीन संरक्षण संरचनेसाठी अत्यंत दूरदर्शी मानले जात आहे. ‘फ्लेमिंगो’च्या पहिल्या यशस्वी हल्ल्याने युक्रेनने जगाला संदेश दिला आहे, “आम्ही स्वतःचे संरक्षण स्वतः करू शकतो.”