Ukraine to ban Indian diesel from Oct 1 over Russia link
युक्रेनने भारताकडून डिझेल खरेदीवर १ ऑक्टोबर २०२५ पासून बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
भारतीय डिझेलमध्ये रशियन घटक आहेत का याची चौकशी युक्रेन करणार आहे.
युक्रेनने ऑगस्ट २०२५ मध्ये भारताकडून तब्बल ११९,००० टन डिझेल आयात केले होते, जे एकूण आयातीच्या १८% होते.
Ukraine ban Indian diesel : जागतिक ऊर्जा बाजारात भारताची भूमिका सातत्याने वाढत असताना आता युक्रेनने भारताकडून येणाऱ्या डिझेलवर बंदी घालण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२५ पासून हा निर्णय अमलात येणार असून युक्रेन सरकारने यामागील प्रमुख कारण म्हणून “रशियन कनेक्शन” दर्शवले आहे.
भारत सध्या आपला मोठा तेलसाठा रशियाकडून स्वस्त दरात विकत घेतो. मध्यपूर्वेतील किमतींच्या तुलनेत रशियन कच्चे तेल खूपच स्वस्त असल्यामुळे भारताला ते परवडणारे ठरते. मात्र, युक्रेनचा आरोप असा आहे की भारताकडून मिळणाऱ्या डिझेलमध्ये रशियन घटक मिसळलेले असू शकतात आणि त्यामुळेच त्यांनी तपासणीची तयारी सुरू केली आहे.
युक्रेनियन ऊर्जा सल्लागार कंपनी एन्कोरने १५ सप्टेंबर २०२५ रोजी अधिकृत घोषणा केली की, भारतातून येणाऱ्या सर्व डिझेल खेपांची तपासणी केली जाईल. विशेष म्हणजे युक्रेनियन सुरक्षा संस्थांनीही आदेश दिले आहेत की भारतातून आलेल्या डिझेलमधील कोणत्याही “रशियन घटकांचा” शोध घ्यावा. कारण, रशियाने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या मदतीने युक्रेनच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले केले आहेत, असा युक्रेनचा दावा आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Gen-Z protest : नेपाळचे संपूर्ण राजकारण अवघ्या 3 दिवसांत बदलले; सुशीला कार्की यांच्या विरोधात Gen-Z मैदानात उतरले
रॉयटर्सच्या अहवालानुसार, युक्रेनने ऑगस्ट २०२५ मध्ये भारताकडून ११९,००० टन डिझेल खरेदी केले होते. हे त्याच्या एकूण डिझेल आयातीच्या १८% इतके आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी म्हणजेच २०२२ पूर्वी, युक्रेन बेलारूस आणि रशियाकडून डिझेल विकत घेत असे. मात्र, युद्धानंतर ही पुरवठा शृंखला खंडित झाली. युक्रेनच्या ए-९५ कन्सल्टन्सीने याआधीच अहवाल दिला होता की, या वर्षी उन्हाळ्याच्या काळात युक्रेनचा एक मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प ठप्प पडला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना भारतासारख्या देशांकडून डिझेल आयात करावे लागले. इतकेच नव्हे तर, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयानेही भारतातून डिझेल विकत घेतले कारण ते जुने सोव्हिएत मानकांशी सुसंगत होते.
युक्रेनियन बाजारातील डिझेल आयातही मागील वर्षांच्या तुलनेत घटली आहे. या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत डिझेल आयात १३% नी कमी होऊन २.७४ दशलक्ष मेट्रिक टनांवर आली आहे. त्यामुळे डिझेलच्या प्रत्येक स्त्रोतावर युक्रेन अधिक बारकाईने लक्ष ठेवत आहे.
भारताकडून होणाऱ्या रशियन तेल खरेदीवरून अमेरिका आणि नाटो देश आधीपासूनच भारतावर दबाव टाकत आहेत. अगदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदीबाबत ५०% शुल्क लादले आहे. त्यामुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा तेल व्यापार हा चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘सगळीकडे फक्त काश्मीर काश्मीर म्हणता…’; टीम इंडियाच्या शेकहॅंड प्रकरणावर पाक पत्रकारांनी घरच्याच नेत्यांची काढली खरडपट्टी
युक्रेनच्या या निर्णयामुळे भारताच्या डिझेल निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, भारतासाठी युक्रेन हा फार मोठा बाजार नाही, त्यामुळे मोठे नुकसान अपेक्षित नाही. पण जागतिक स्तरावर भारताचे रशियाशी असलेले तेलसंबंध पुन्हा एकदा चर्चेत येणार हे निश्चित.