US-Iran tensions have risen with Trump repeatedly threatening over Iran's nuclear program
तेहरान / वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराणमधील तणावग्रस्त संबंध पुन्हा एकदा शिगेला पोहोचले आहेत. ओमानच्या राजधानीत मस्कत येथे अलीकडेच दोन्ही देशांमध्ये झालेल्या गुप्त अणुचर्चांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, इराणमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांना इशारा दिला आहे की, जर त्यांनी अमेरिका, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्यास नकार दिला, तर देश मोठ्या संकटात सापडेल आणि सरकारही कोसळू शकते.
इतिहास पाहता, खामेनेई हे नेहमीच अमेरिका विरोधात ठाम भूमिका घेत आले आहेत. त्यांनी यापूर्वी अमेरिकेशी कोणत्याही प्रकारचा अणुकरार नाकारला होता. मात्र, आता देशातील अर्थिक संकट, वाढती महागाई आणि आंतरराष्ट्रीय दबाव लक्षात घेता, खामेनेई काही प्रमाणात नरम झाले आहेत. अहवालानुसार, इराण युरेनियम समृद्धीकरण थोड्या प्रमाणात कमी करण्यास तयार आहे, तसेच त्यावर कडक आंतरराष्ट्रीय देखरेखीचाही स्वीकार केला जाऊ शकतो. मात्र, इराण त्यांच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर कोणतीही चर्चा करणार नाही, असे खामेनी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते म्हणतात की हा कार्यक्रम त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : युक्रेन दोन भागात विभागले जाणार! काय आहे ट्रम्पच्या दूताचा ‘प्रस्ताव’ आणि पुतिनची ‘खळबळजनक’ प्रतिक्रिया?
न्यू यॉर्क टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा चेतावणी दिली आहे की, जर अमेरिका-इराण करारावर सहमती झाली नाही, तर अमेरिका नॅटांझ आणि फोर्डो या प्रमुख अणुऊर्जा केंद्रांवर थेट हल्ला करू शकते. अमेरिकेचा असा ठाम विश्वास आहे की कोणत्याही परिस्थितीत इराणला अण्वस्त्रे बनवण्यापासून रोखणे गरजेचे आहे. ही धोरणात्मक भूमिका केवळ अमेरिका नव्हे तर इस्रायलसाठीही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
इराणमधील अनेक वरिष्ठ राजकीय व न्यायप्रणालीतील नेत्यांनी खामेनी यांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर त्यांनी ट्रम्प यांच्याशी संवाद साधला नाही, तर देशाची आर्थिक परिस्थिती आणखी ढासळेल आणि सरकार कोसळू शकते. इराणचे नवे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी देखील असेच मत मांडले असून त्यांनी सांगितले की, इराण सध्या कोणत्याही प्रकारच्या युद्धाचा भार सहन करण्याच्या स्थितीत नाही. त्यामुळे अणुचर्चांद्वारे शांतता आणि स्थैर्य राखण्याचा मार्ग शोधणे अत्यावश्यक आहे.
ओमानमध्ये झालेल्या प्राथमिक चर्चांमध्ये अमेरिकेचे स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे अब्बास अराक्ची सहभागी झाले होते. या बैठकीचे आयोजन ओमानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केल्याचे समजते. दोन्ही देशांनी १९ एप्रिल रोजी पुढील फेरी आयोजित करण्याचे ठरवले आहे. इराणकडून प्रादेशिक धोरणांवर – जसे की हमास, हिजबुल्ला आणि हौथी बंडखोरांना दिला जाणारा पाठिंबा – चर्चा होऊ शकते, अशी तयारीही दर्शवण्यात आली आहे. मात्र, अमेरिकेसाठी क्षेपणास्त्र कार्यक्रमावरील चर्चा अनिवार्य आहे, आणि हीच गोष्ट दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा संघर्षाचे कारण ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : नेपाळमधील बीरगंजमध्ये हनुमान जयंती मिरवणुकीवर दगडफेक, तणावग्रस्त परिस्थिती; संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू
अमेरिका आणि इराणमधील सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. एका बाजूला विनाशाचे सावट, तर दुसऱ्या बाजूला संवादाच्या शक्यता आहेत. खामेनी यांनी जरी काही प्रमाणात लवचिकता दाखवली असली, तरी अमेरिकेच्या अटी कठोर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचा झुकाव दडपशाही आणि धमक्यांच्या धोरणाकडे असल्यामुळे ही चर्चा कितपत यशस्वी ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. एकूणच, येत्या 19 एप्रिलच्या बैठकीतून जगाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी उलगडण्याची शक्यता आहे.