US President donald Trump praises Indian-American second lady Usha Vance
वॉश्गिंटन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या जागतिक स्तरावर चर्चेचा विषय बनत आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी अनेरक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या निर्णयांमुळे जागतिक स्तरावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स यांचे कौतुक केले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, उषा व्हॅन्स त्यांच्या नवऱ्यापेक्षा जास्त हुशार आहेत. मी त्यांना उपराष्ट्रपती म्हणून निवडले असते.
सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून जेडी व्हॅन्स यांनी शपथ घेतली. व्हॅन्स यांच्या शपथ घेतल्यानंतर 39 वर्षीय उषा व्हॅन्स पहिल्या भारतीय-अमेरिकन आणि हिंदू द्वितीय महिला उपाध्यक्ष बनल्या. उषा व्हॅन्स यांनी पतीच्या शपथविधी दरम्यान गुलाबी कोट परिधान केला होता. त्यांच्यांसोबत जेडी व्हॅन्स आणि उषा व्हॅन्स यांची मुलगी मिराबेल रोजही होती. जेडी व्हॅन्स यांनी धार्मिक ग्रंथावर डावा हात ठेवून उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
कोण आहेत उषा व्हॅन्स ?
आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील वड्लूर हे उषा यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव आहे. वकील म्हणून आपले करिअर घडवणाऱ्या आणि भारतीय स्थलांतरितांच्या कन्या असलेल्या उषा व्हॅन्स या अमेरिकेच्या दुसऱ्या महिला उपाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या सर्वांत तरुण महिलांपैकी एक ठरल्या आहेत.
उषा यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती ब्रेट काव्हानॉफ आणि जॉन रॉबर्ट्स यांच्यासोबत काम केले आहे. त्या येल लॉ स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना जेडी व्हॅन्स यांची भेट झाली. 2014 साली त्यांचे लग्न झाले, यामध्ये हिंदू पुजाऱ्याच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पूजाही करण्यात आली.
भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान व्यक्त केला
उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुले आहेत – दोन मुले इवान आणि विवेक, आणि मुलगी मिराबेल. उषा व्हान्स यांनी जुलै महिन्यात रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनमध्ये आपले भारतीय पार्श्वभूमी आणि संस्कृतीबद्दल मोकळेपणाने सांगितले. त्यांनी म्हटले की, “माझ्या आणि जेडीच्या आयुष्याचा प्रवास खूप वेगळा आहे, पण आमचे कुटुंब आणि मुलांचे संगोपन यावर आमच्यात खूप चांगले एकमत आहे,” असे त्या म्हणाल्या. भारतीय-अमेरिकन समुदायाच्या राजकीय सक्रीयतेमध्ये उषा व्हॅन्स यांचे यश महत्त्वाचे पाऊल आहे.